अमळनेर : मातृभाषा संस्कार व संस्कृतीची वाहक आहे. त्यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा अर्थात मराठी भाषेचा वापर केला पाहीजे. मराठीचा सन्मान हाच महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र संस्कृतीचा सन्मान आहे असे मत देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे शिक्षक अरुण सोनटक्के यांनी मांडले. ते महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रमावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सोनटक्के यांनी सांगितले की, साहित्य ही माणूस संसारातील समर्थ वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहतो. संस्कृती आणि संस्काराच्या प्रवाहात सातत्य राखण्याचे काम भाषा करत असते. अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मराठी मातृभाषेचे महत्त्व विशद केले. शाळेत आठवी नववीच्या विदयार्थ्यांनी कवीता, म्हणी, वाक्प्रचार सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक एस.के.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.