अमळनेर : गांधींच्या असहकार आंदोलनाचे शस्र जनतेने केंद्र सरकारच्या एन पी आर, एन आर सी, सी ए ए विरोधात उगारावे ! असे आवाहन राष्ट्र देवा दलाचे राज्य अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी केले. लोकशाही बचाव नागरी कृती समिती आयोजित शिबिरात ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या सभागृहात बोलत होते.
डॉ.खैरनार पुढे म्हणाले की, सरकारी आकडयानुसार देशात संशयास्पद नागरिक ३२ हजार इतके आहे. तरीही संपूर्ण देशात एन आर सी सारख्या कायद्याच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करून देशातील आर्थिक मंदी, निम्मा झालेला विकास दर, बेरोजगारी अश्या मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करुन हिंदू-मुस्लिम धार्मिक फाळणी करण्याचा उद्देश आहे. महात्मा गांधींनी १९०६ ला दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम तेथील नागरिकत्व कायद्या विरोधात भारतीयांसाठी सत्याग्रह आंदोलन केले. त्याच मार्गाने देशात लोकांनी असहकार आंदोलन करावे असेही मत डॉ.खैरनार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी अमळनेर शहरात ३० दिवसांपासून सलग सुरू असलेल्या एन आर सी, सी ए ए विरोधी धरणे आंदोलनास भेट देऊन संबोधित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन दलित नेते रामभाऊ संदानशिव यांनी केले. प्रास्ताविकात प्रा.अशोक पवार यांनी जनतेत अभ्यासपूर्ण असा ठोस कृती कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी कार्यकर्ते तयार होणे गरजेचे आहे असे आवाहन केले. सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.लिलाधर पाटील यांनी केले.
शिबिरास संदिप घोरपडे, प्रा.शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ पाटील, नगरसेवक मनोज पाटील, फैय्याज पठाण, नगरसेवक श्याम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पाटील, गौतम सपकाळे, यशवंत बैसाने, भारती गाला, योजना पाटील, विनोद कदम, प्रा.जयश्री साळुंके, प्रा.सुनिल वाघमारे, शिक्षक संघटनेचे कैलास पाटील, सिद्धार्थ सपकाळे आदिंसह विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.