महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना २०१९ कर्जमुक्तीची यादी प्रसिद्ध; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

लाभार्थ्यांच्या याद्या विविध कार्यकारी संस्थेचे कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येतील

अमळनेर : तालुक्यातील १२ हजार २५३ शेतकऱ्यांपैकी जिल्हा बँकेचे १० हजार ९५४ व राष्ट्रीयीकृत बँकेचे १७३२ जणांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीत त्रुटी तपासण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती बँकेच्या अधिकारी व सचिव यांच्या बैठकीत मिळाली. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी बँक अधिकारी व सचिव यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेत त्यांना काही सूचना देण्यात आल्या.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवार २९ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर शनिवारी प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे, अशी घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली होती त्यानुसार दुसऱ्या यादीमध्ये तालुक्यातील एकूण १४ हजार ७३६ शेतकऱ्यांपैकी १२ हजार २५३ लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या खात्यावर विनाविलंब पैसे पडावेत व येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना २०१९ ची कर्जमुक्तीची गावनिहाय यादी प्रसिद्ध झालेलीआहे. सर्व शेतकरी बांधवांनी आपले सोबत १.आधार कार्ड २.बँकेचे बचत खाते पासबुक ३.प्रसिद्ध केलेले यादीतील विशिष्ट क्रमांक ४.आधारसोबत संलग्न असलेला आपला मोबाईल क्रमांक या गोष्टी सोबत घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई महासेवा केंद्र या केंद्र चालकांशी संपर्क साधून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. आपले आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यास आपल्या बँक खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा होणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी कर्ज मुक्त रक्कम बरोबर असल्यास लवकर कर्जमुक्त होण्यासाठी जवळच्या सरकार सेवा केंद्रावर किंवा स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे. लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांमध्ये जे मयत झाले असतील त्यांच्या वारस लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी त्यांच्या वारसांचा एक अर्ज, सोबत सोसायटीचे कव्हरिंग लेटर जोडून मयत यादी गोळा करून ती तहसीलदार यांच्याकडे द्यावी त्यावर तहसीलदार रिपोर्ट तयार करून तो पाठवतील. त्यावर आमदारांची समिती निर्णय घेईल, त्यानुसार लाभ मिळेल. अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी सचिवांना दिली. त्यानुसार मयत झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत.

आधार कार्डच्या थंब वर अंगठा न उमटणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे. तर कर्जमाफी यादीतील लिंकिंगसाठी जवळचे सरकार सेवा केंद्र (सीएससी केंद्र) व गावातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपला अंगठा देऊन यादीतील नावाला आधार लिंक करावे. १२ हजार २५३ लाभार्थ्यांच्या याद्या विविध कार्यकारी संस्थेचे कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानुसार आपण आपले आधार लिंक करावे असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!