भविष्यात मेहेरगाव जिल्ह्यात शाश्वत विकासाचे रोल मॉडेल ठरेल : खासदार उन्मेश पाटील

अमळनेर : सज्जन शक्ती पुढे आली आणि अधिकारी, पदाधिकारी यांनी हातात हात घेऊन गावाच्या विकासाचा संकल्प केला तर काय विकास घडू शकतो ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव. विविध उपक्रमांतून या गावाने आपले वेगळेपण जपले असून भविष्यात मेहेरगाव हे जळगाव जिल्ह्यात शाश्वत विकासाचे रोल मॉडेल ठरेल असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील मेहेरगाव येथे नुकतेच हागणदारीमुक्त गाव उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांचे आगमनावेळी गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम स्वागत कमानी जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन खासदार पाटील यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी जि.प.सदस्य संदीप पाटील, जेष्ठ नेते झुलालआप्पा पाटील, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, पाणी फाउंडेशनचे सुखदेव भोसले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पाटोडे, नाटेश्वर पाटील, सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी, पातोंडा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कुलकर्णी, डॉ.संदीप चौधरी, मेहेरगाव सरपंच छायाताई पाटील, शरद पाटील, ग्रामसेवक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की, गावकऱ्यांना मोफत शुद्ध पाणी, मोफत दळणाची सोय, सुसज्ज अभ्यासिका, व्यायाम शाळा, गावातील रस्त्यांचे १००% काँक्रीटीकरण, संपूर्ण गावात एल ई डी दिव्यांची व्यवस्था, चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल अंगणवाडी व जि.प.शाळा, व्यसनमुक्त गाव, शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव, महिलांच्या नावाने डोअर नेम प्लेट तसेच कन्या जन्मदराचे अधिक प्रमाण अशा अनेक उपक्रमांतून मेहेरगावने आपले वेगळेपण जपले आहे. गावाच्या आर्थिक समृद्धी सोबत मनाची समृध्दी महत्वाची आहे. भांडायचे नाही तर मांडायची वृत्ती ठेवा. कृतीशील ध्येय असलेल्या गावकऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी. गावाच्या पुढील वाटचालीस जी मदत करता येईल ती करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेहेरगाव ग्रामपंचायत ही जिल्ह्यात आदर्श असून या गावातील विकासाची घौडदौड पाहण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, पदाधिकारी यांचा लवकरच अभ्यास दौरा आयोजित करू अशी ग्वाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिली. गावात विविध ठिकाणी भेट देऊन त्यांनी गावाच्या प्रगतीची पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या हस्ते सरपंच छायाताई पाटील, ग्रामसेवक अनिल सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी प्रास्ताविकात गाव विकासाचा प्रवास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर आभार सुखदेव भोसले यांनी मानले. श्रीमती लांडगे यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. खासदार पाटील यांचे हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिलांसह गावकऱ्यांची गर्दी होती.

मेहेरगावची यशोगाथा राज्यभर पोहचेल असा विश्वास…

मेहेरगाव येथील विकासाची गाथा आज प्रत्यक्ष पाहता आली. राज्यात आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मेहेरगाव विकासाकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यात गावातील सर्व माता भगिनींचे बँक खाते उघडून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. लवकरच गावकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करून चष्माचे वाटप करू. ज्यांना गरज असेल त्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून गाव मोतिबिंदू मुक्त करु असे सांगून या गावाची यशोगाथा लवकरच राज्यभर पोहचेल असा विश्वासही खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला.

Share this news:

One thought on “भविष्यात मेहेरगाव जिल्ह्यात शाश्वत विकासाचे रोल मॉडेल ठरेल : खासदार उन्मेश पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!