बुलडाणा येथील दिव्याफाउंडेशनतर्फे ‘उडान’ नारीशक्तीची भरारी.. हा कार्य गौरव कार्यक्रम संपन्न

अमळनेर : भारतातील नारीशक्तीला सबलीकरणाचे विविध आयाम आहेत. आज वेगवेगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. काेणतेही क्षेत्र त्याला अपवाद नाही. ८ मार्च अर्थातच स्त्रीत्वाचा, आत्म सन्मानाचा आणि तिच्या कसोटीचा उत्सव. हा दिवस यशाच्या अवकाशात उडान भरणाऱ्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याने व तिला सलाम करण्यासाठी बुलडाणा येथील गर्दे हॉलला दिव्या फाउंडेशनच्या वतीने “उडान” नारीशक्तीची भरारी या कार्य गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमांन चंद्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी सावंत, सह आयुक्त जी.एस.टी स्वाती थोरात, पतीच्या जीवन संघर्षासाठी ६५ वर्षीय मॅरेथॉन धावणारी आदर्श पत्नी लता भगवान करे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे, डॉ. प्रचीती पुंडे, ‘चला हवा येऊ द्या’ फेम चैताली मानकर जिल्हा महिला न्यायाधीश, समाजसेविका पुणे माधुरी संतोष बारणे यांची विशेष उपस्थिती होती.
या सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तसेच बुलडाणा जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा “राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार” तसेच “जिजाऊ कन्या पुरस्कार”, शूर तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील सतत कार्यरत असणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला महिलांनी महाविद्यालयीन मुली, ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अमळनेर येथील प्रा जयश्री दाभाडे यांना देखील शूर तेजस्विनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा दाभाडे ह्या गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक मोर्चे आंदोलने यांच्या मार्फत समाजातील गरजू वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. प्रा दाभाडे अमळनेरात महाविद्यालयात कार्यरत असून सामाजिक बांधीलकी जपत अनेक कुटुंबाचे समुपदेशन करून समेट घडवून आणला आहे. शहरातील बालविवाह थांबविण्या पासून ते थेट रेशन भ्रष्टाचार, वाळू माफिया यांच्याशी टक्कर घेत भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. विविध पदांवर कार्यरत असताना समाजातील आदिवासी, बहुजन, दलित घटकातील सामान्य जनता न्याय मागण्यासाठी बिनधास्त आणि निःसंकोचपणे प्रा दाभाडे यांच्या कडे धाव घेतात. अमळनेर शहरातील त्या एकमेव महिला पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.