जळगाव : स्त्रीशक्तिद्वारा संचलित जगातील सर्वात मोठी संघटना प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका ‘स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ राजयोगीनी ब्रह्माकुमारी डॉ. जानकीदादी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले. माऊंट आबू, राजस्थान येथील ग्लोबल हॉस्पिटल मध्ये २७ मार्च रोजी सकाळी २ वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून श्वास आणि पोटाचा आजार होता, त्यांचेवर यासाठी उपचारही सुरु होते. त्यांचे अंतिम संस्कार ब्रह्माकुमारीज् मुख्यालय शांतीवन येथील संमेलन सभागृहासमोरील मैदानात आज दुपारी ३.३० वाजता होईल.
स्त्री शक्तिच्या प्रेरणास्त्रोत ब्रह्माकुमारी दादी जानकी यांचा जन्म १ जानेवारी १९१६ मध्ये हैद्राबाद सिंध येथे झाला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेचा आध्यात्मिक मार्ग निवडला व त्यात त्या संपूर्णपणे समर्पित झाल्यात. आध्यात्मिक प्रगतीचे शिखर पादाक्रांत केलेल्या राजयोगीनी दादी जानकी यांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथीपर्यंत झाले. परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या आभाने तेजपू्ंज होऊन त्यांनी जगात भारतीय दर्शन, राजयोग आणि मानवीय मूल्यांच्या स्थापनेसाठी केलेले कार्य अद्वितीय ठरले. भारताप्रमाणे विदेशातही राजयोगाचा प्रसारासाठी त्यांनी सन १९७० मधील पाश्चिमात्य देशांचा दौरा केला. जगातील १४० देशामध्ये मानवीय मूल्यांचे बीजारोपण करुन हजारो सेवाकेंद्रांची स्थापना करुन लाखों लोकांमध्ये एक नवीन जीवन फुलविले.
राजयोगीनी दादी जानकी यांनी मन, आत्मा यांच्या आंतरीक स्वच्छतेबरोबर बाह्य स्वच्छतेसाठीही अद्वितीय कार्य केले. ज्यायोगे भारत सरकारने त्यांना स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसिडर बनविले होते. दादी जानकी यांच्या देहावसानची बातमी ऐकताच देश विदेशातील संस्थेच्या अनेक सदस्यांनी त्यांचेसाठी योगाभ्यास सुरु केला. त्यांचे पार्थीव शरीर माऊंट आबू हून आबूरोड शांतीवन येथे आणले जाईल. भावपूर्ण श्रद्धांजली नंतर पंचतत्वात विलीन केले जाईल.