अमळनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार स्मिताताई वाघ यांनी प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांची भेट घेऊन शहरासह तालुक्याचा आढावा घेतला. सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन सर्वांनी मिळून कोरोनाशी लढा देण्याची भावना बोलून दाखवली. आयएमए संघटना आणि खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून सानेगुरूजी शाळेत सुरू असलेल्या रुग्ण तपासणी केंद्रालाही भेट देवून डॉक्टरांचे विशेष आभार मानले व स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्वांच्या सोबतीने कोरोनाशी सुरू असेलली लढाई आपण निश्चितच जिंकू असा विश्वासही त्यांनी सर्वांना दिला. देशभर कोरोना साथीने पाय रोवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर साथीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. यामुळे या काळात नागरिकांनी घरातच राहून कोरोनाशी लढा देणे अपेक्षित आहे. यासाठी आमदार स्मिताताई वाघ यांनी पुढाकार घेतला आहे. भेटीवेळी डॉक्टरांकडे रुग्ण तपासणीसाठी असलेल्या कीटची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे लक्षात आल्याने आमदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हा शल्यचिकत्सक आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून अमळनेरात सुरू करण्यात आलेला रुग्णतपासणीचा विधायक उपक्रम यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक कीट उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अधिक कीट मिळून रुग्णांची तपासणी आणि डॉक्टरांचीही सोय होणार आहे. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, माजी शहर अध्यक्ष शितल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील, राजेश वाघ, निवास मोरे, किरण वारुळे, राहुल चौधरी आदी उपस्थित होते
कार्यकर्त्यांना रक्तदानासाठी आवाहन
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यात कोरोनोच्या रुग्णांनाच नव्हे तर अन्य आजाराच्या रुग्णांनाही रक्ताची गरज भासू शकते. त्यामुळे शहरासह तालु्क्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह भारतीय जैन संघटनेच्या माध्यामातून रक्तदान करणाऱ्यांची नावांची यादी तयार घेण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यात रक्तदात्यांची यादी तयार करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून रक्तदान करण्याच्या सूचना केल्या आहेत.
होम क्वॉरनटाईंनना गांधीगिरीने घरातच थांबवा
अमळनेर शहरासह तालुक्यात तब्बल ३९०० जण बाहेरील शहरातून आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. त्या सर्वांना होम क्वॉरनटाईनचा शिक्का मारून १४ दिवस घरीच बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यातील काही होम क्वॉरनटाईन हे गावात फिरत असल्याने अन्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहेत. शासकीय यंत्रणेकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी ग्रामीण भागातील बुथ कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांना सूचना करून बाहेर फिरणाऱ्या होम क्वॉरनटाईन यांना फुल देऊन गांधीगिरी करीत घरातच थांबण्याची विनंती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामसेवकांना हेडक्वार्टरला राहण्याच्या सूचना
आमदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंशी मोबाईलवर संपर्क साधून ग्रामसेवकांनी आपल्या हेड क्वार्टरला लक्ष देऊन ग्रामीण भागातील जनतेला सहकार्य करावे असे आदेश व सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनोला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.
ग्रामीण भागात दवंडी देऊन कृऊबात करणार लिलाव
बाजार समितीतील लिलावही संचारबंदीमुळे थांबले आहेत. अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून आठ ते दहा गावांना दवंडी देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव करण्याचे सभापती प्रफुल्ल पवार यांना आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसाठी आणि शेतकऱ्यांचे होणारे हालही थांबणार आहेत. यादृष्टीने लिलावाचे नियोजन बाजार समितीमार्फत करण्यात येणार आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या मागर्दशर्नाखाली काम
भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावळे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना संदर्भातील उपायोजनांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार, महाराष्ट्रात काम सुरू आहेे. त्यामुळे अमळनेर शहरात ठाण मांडून आपण कार्यकर्त्यांसह डॉक्टरांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाशी सुरू असलेली लढाई निश्चित जिंकू असा विश्वास आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला आहे.

