नागरिकांना कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची झळ पोहचू नये व पाण्यासाठी झुंबड होऊ नये म्हणून दक्षता
अमळनेर : पुढील महिन्यांतील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बोरी नदीत तामसवाडी धरणाचे व पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी धुळे येथील जिल्हाधिकारी गंगाधरण यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर जळगाव जिल्हा परिषदेने आवर्तन मागणीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील यांनी दिली आहे. बोरी धरणाबाबत जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचेकडे देखील मागणी केली असून त्याबाबत लवकर निर्णय होणार आहे अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.
अक्कलपाडा धरणामुळे अमळनेर तालुक्यातील ४० ते ४५ गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही मागणी केली असून लवकरच धरणाचे पाणी सोडले जाईल. यावर्षी अक्कलपाडा पूर्ण भरल्यानंतर पाणी सोडल्याने फारशी टंचाई जाणवली नाही. तरीही मार्च महिन्यात पांझरा नदी पात्र कोरडे झाले असल्याने असंख्य गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अक्कलपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे या नदीकाठावरील गावांना विहीर अधिग्रहण अथवा पाणी टंचाई होत नाही. अमळनेर तालुक्यातील मांडळ ते नीम कपिलेश्वर मंदिर या नदी संगमापर्यंत काठावरील गावांच्या पाणीपुरवठा योजना या नदीवर आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली की, पाणी योजनांना घरघर लागते, मग टंचाई सुरु होते. त्यामुळे आवर्तन सोडले की पाणी टंचाई वरील अनाठायी खर्च कमी होतो. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा पाणीटंचाईची झळ पोहचू नये व पाण्यासाठी झुंबड होऊ नये म्हणून बोरी नदीत तामसवाडी धरणाचे व पांझरा नदीत अक्कलपाडा धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ, वावडे, जवखेडा, मुडी, बोदर्डे, लोणसीम, लोणचारम, लोण बुद्रुक, लोण खुर्द, भरवस, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, शहापूर, तांदळी, तर धुळे जिल्ह्यातील न्याहळोद, कौठळ, कंचनपूर, तामसवाडी, वालखेडा, अजंदे, बेटावद, पढावद आदी गावांना याचा लाभ होणार आहे.
बोरी नदीतही आवर्तन सुटणार
बोरी नदीकाठावरील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पिण्याचे व शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.बी.बेहरे यांच्याकडे चर्चा केली. त्यानुसार चर्चा होऊन एप्रिल महिन्यात बोरी नदीत पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी आमदार पाटील यांना दिली. कोरोना पार्श्वभूमीवर पाणी पिण्यासाठी उपयोगात येईल नदी काठावरील गावांची पिण्याचे पाण्याची समस्या सुटणार आहे. शिरसोदे, बहादरपूर, भिलाली, अंबापिंप्री, कोळपिंप्री, बोरीतील आवर्तनाचा लाभ कोळपिंप्री पर्यंतच्या गावांसह होत असून हे पाणी पुढे फापोरे, कन्हेरे, हिंगोणे, बहादरवाडी, अमळनेर व पुढील गावांना होणार असून हे पाणी सोडल्यानंतर याठिकाणी मंगरूळसह १० गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी असल्याने त्या योजना जिवंत होतील व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.