संकटसमयी फटाक्यांची आतषबाजी करणे म्हणजे मानवतेला लाजवणारे

अमळनेर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी बळ मिळावं, जीवनातला अंध:कार दूर व्हावा, देशाची एकात्मता अखंड राहावी या स्वच्छ हेतूने रविवार ता.५ रोजी रात्री ९ वाजता सर्व विद्युत लाईट्स बंद करुन पणती, दिवा, मेणबत्ती वा टॉर्च फक्त नऊ मिनिटे पेटविण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, सरकारचे निर्देश पाळत देशातील जनता एकवटली. घरा घरात दारावर, गच्चीवर दिवा पेटला. उजळल्या ज्योतीला साऱ्यांनी नमस्कार केला आणि प्रत्येकाने त्या तारणहर्त्याला मनातलं मागणं मागितलं. दिव्याच्या मंद प्रकाशात सारा देश चमकला. काहींनी आपली कल्पकता वापरुन इंग्रजीत गो कोरोना लिहून त्यावर ठराविक अंतराने मेणबत्त्त्या सजवून ज्योती पेटवल्या. त्यामागची भावना रास्तच आहे.

आजच्या विज्ञान युगात या सर्व प्रकारामुळे कोरोना पळतील असंही नाही मात्र.. आज देशासाठी एक दिवा पेटवून संकटसमयी लढण्यासाठी एकीचं बळ दाखवून दिलं. यानिमित्ताने जनतेला सेवा देणाऱ्या हजारो हातांचे आभार मानता आले. ज्या कोणाचे प्राण गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करता आली. सर्वत्र नऊ मिनिटांसाठी ज्योतींचा मंद प्रकाश पसरला. यावेळी काहींनी शंख वाजविला. वंदे मातरम्, भारत माता की जय, गो कोरोना आदी घोषणांनी आसमंत दुमदुमला. काहींनी भांड्यांचा खडखडाट केला तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत जणू दिवाळीच साजरी झाली. सध्याच्या दु:खमय वातावरणात फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी करणे म्हणजे मानवतेला लाजवणारे नाही का ? असा प्रश्न पडतो. फटाके फोडून आनंद घेण्यापेक्षा एक दिवा पेटवला असता तर या अखंड एकात्मतेचे भागीदार होता आले असते. ही वेळ घरातील कर्त्याला आपण नीट समजून घेण्याची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही एवढे खरे.