सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून आधार बहुउद्देशिय संस्था व विप्रो च्या सहकार्याने माजी आमदार साहेबराव पाटील यांचा अभिनव उपक्रम

अमळनेर : शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत शासन निर्देशानुसार जनजागृती मोहीम सातत्याने राबविली जात आहे. उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, तहसीलदार मिलींद वाघ, पोलीस निरिक्षक अंबादास मोरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या माध्यमातून घंटागाडीद्वारे सातत्याने करण्यात येत आहे.
ता.२४ मार्च पासून लॉक डाउन असल्यामुळे शासन, सामाजिक संस्था, दात्यांकडून गरजूंना मदत केली जात असून घेणाऱ्यांची गर्दी होवू नये म्हणून योग्य खबरदारी घेतली जात आहे. शिजवलेले अन्नही पुरविले जात असून उरलेले अन्नाची नासाडी होवू नये त्यास आळा बसावा म्हणून येथील पिंपळे रोड, शांतीनगर येथील आदिवासी वस्तीतील ६५ गरजू कुटुंबांना होणारी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून कुटुंबासह स्वत:चे अन्न घरातच राहून तयार करणे कामी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रायोगिक तत्वावर दैनंदिन गरजेचे अत्यावश्यक सामान ५ क्विंटल गहू, १ क्विंटल बटाटे, १ क्विंटल वांगी, १ क्विंटल कोबी, ५० किलो हिरवी मिरची, ६५ किलो तेल, ६५ किलो मीठ, ३५ किलो मिरची पावडर, २० किलो मसाला पावडर , ५ किलो हळद -जीरे -मोहरी, १५० मास्क आणि विप्रो तर्फे २८० संतुर साबण असे एकुण रक्कम रुपये ५० हजार किंमतीच्या मालाचे सम प्रमाणात वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, नगरसेवक विवेक पाटील, ॲड.यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक घनश्याम पाटील, विक्रांत पाटील, दिपक चव्हाण, अभिषेक ढमाळ, आधार बहुउद्देशिय संस्थेच्या चेअरमन भारती पाटील, जयश्री ठाकरे, अश्विनी सूर्यवंशी, वैशाली शिंगाने, कलीम खान, तौसिफ खान, संजय कापडे, किरण भिल, सुरेश भिल, नामदेव भिल आदी उपस्थित होते.