अमळनेरः राज्यभर कपाशी पिकाला यावर्षीही नेमके वाढ व फुले, पात्या येण्याच्या अवस्थेत सतत पाऊस, रोगराई व ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने कपाशीचे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
राज्यभर पावसाला विलंब झाल्याने या खरीप हंगामात सर्वत्र पेरणीला उशीर झाला. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या अल्पशा पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर सतत पाऊस सुरु राहिला. ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. सततच्या पाऊसामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली. पिकावर रोगराई वाढली. शेत तणाने व्यापल्याने पिकांचे नियंत्रण करता आले नाही. कपाशी पिकाची वाढ, फुले व पात्या झाडाला धरण्याच्या अवस्थेत पाऊस झाल्याने कपाशीवर प्रतिकूल परिणाम झाला. सततच्या पावसामुळे शेतात बुरशी निर्माण झाली. झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडल्याने कपाशीची बोंडे सडली. काही ठिकाणी काळवंडली आहेत. जमिनीवरील पीक पिवळे पडले. आता पिकांना काहीसे अनुकुल वातावरण तयार झाले आहे. अलीकडे पुन्हा पावसाची चिन्हे दिसू लागल्याने कपाशीचे सर्व पीक हातचे जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशीचे पीक दिवाळीत घरी येते. तथापि, यावर्षी अद्याप हे पीक काही ठिकाणी फुलांवर, तर काही ठिकाणी बोंड्यांच्या अवस्थेत आहे. आता पावसाने उसंत घेतल्यास उसिरा का होईना काहीसे उत्पन्न हाती लागणार आहे. वेळीच पिकांचे नियंत्रण न करता आल्याने यावर्षी कपाशीचे किमान ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
