नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा स्तुत्य उपक्रम.

अमळनेर : कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून अमळनेर नगरपरिषदेचे सफाई कामगार शहरातील रोगराई व घाणीच्या साम्राज्याशी दोन हात करीत आहेत. ता.१४ रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून अशा सर्व सफाई कामगारांना सन्मानपूर्वक भेट देण्याचा निर्णय अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने घेतला होता.
याकरीता नगरपरिषदेचे एकूण दोनशे अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार २ लाख २७ हजार रुपये व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी एक महिन्याचे मानधन २० हजार रुपये अशी एकुण २ लाख ४७ हजार रक्कमेचे प्रत्येकी रुपये ६५० प्रमाणे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवास अभिवादन करुन सोशल डिस्टन्सिंग राखत भेट वाटप उपक्रमाची प्रातिनिधीक स्वरुपात डाॅ.बाबासाहेब यांच्या साक्षीने सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, दलित नेते रामभाऊ संदानशिव, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, शेखा हाजी मिस्तरी, सोमचंद संदानशिव, जगदीश ठाकरे, गोल्डी भाऊ व काही समाजबांधव उपस्थित होते.