
अमळनेेर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या लाॅकडाऊन काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात निरंतर मदत व्हावी त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, मोबाईलचे महत्व अनन्यसाधारण आहे. या साधनांचा वाढता वापर पाहून अमळनेर तालुक्यातील शिक्षकांनी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट तयार केल्या आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक माहिती तसेच शिक्षकांना व पालकांना उपयुक्त विविध संकेतस्थळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय बारकू सोनवणे आणि लोकमान्य माध्य. विद्यालय ता.अमळनेर शाळेतील शिक्षक भूषण सुरेश महाले यांनी सदर शैक्षणिक वेबसाईट तयार केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन करत तसेच जिल्हास्तरीय तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षणातील मिळालेल्या ज्ञानाचा व वेळेचा सदुपयोग करुन विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना शैक्षणिक व इतर आवश्यक माहितीचा साठा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल तसेच विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व अवांतर वाचनास मदत होऊन ई-लर्निंग चा आनंद घेता येईल या हेतूने “ज्ञानसाधना” या शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती केल्याचे जि.प.शाळा, पिंगळवाडे येथील तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले.
शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. वेबसाईटच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करुन देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे डिजीटल होण्याची आवडही निर्माण होण्यास मदत होईल. तसेच युट्युब चॅनलवरही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध असल्याचे लोकमान्य विद्यालय,अमळनेर येथील तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले यांनी सांगितले.
www.dattasonawane.blogspot.com आणि www.bhushanmahale.blogspot.com या शैक्षणिक वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन या शिक्षकांनी केले आहे. अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शापोआ अधिक्षक बी.पी.चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच गृपसह तालुक्यातील शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

पिंगळवाडे येथिल मुख्ययाध्यापक, प्रताप मिलचे रहिवासी आमचे मित्र, दत्तात्रय सोनवणे व श्री महाले सर यांचे अभिनंदन . आपण वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थी , शिक्षक व समाजासाठी ऊत्तम कार्य केले आहे…दोघांनाही शुभेच्छा..।
धन्यवाद..।
धन्यवाद..!