जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समाधान आहे. नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, मात्र.. काळजी घ्यावी : डॉ. भास्कर खैरे

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात १७ एप्रिल रोजी आढळून आलेली तिसरी कोरोनाबाधीत अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६० वर्षीय महिला बुधवारी कोरोनामुक्त होवून घरी परतल्याने जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णालयात अधिकारी, कर्मचार्यांचे घेतलेले परिश्रम सार्थकी लागले असून यशस्वी उपचारानंतर ही महिला कोरोनामुक्त झाली. डॉक्टरांसह कर्मचार्यांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी वृध्द महिलेने ‘बठ्ठा, डाक्टर मना मायबाप, भाऊ शेतस ! सगळासन चांगलं होई’ अशा शब्दात आशीर्वाद देत भावना व्यक्त केल्या.
मुंगसे येथील ही महिला कोरोना संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल झालेवर दुसर्या दिवशी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती महिला कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले होते. अवघ्या १५ दिवसात ही महिला कोरोनामुक्त झाल्यानंतर या महिलेला दोन दिवस कोरोना रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निगराणीत ठेवण्यात आले. यानंतर प्रकृती चांगली असल्याने तिला बुधवारी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत डिस्चार्ज देण्यात आला. मुंगसे येथे एका रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी पाठविण्यात आले. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील आदींनी अहारोत्र रुग्णांची सेवा केली. या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांचेही सहकार्य लाभले.