
अमळनेर : कोरोनाची साथ वाढू नये म्हणून काळजी घेणाऱ्या बँकांनी कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी विशेषतः वृद्ध स्त्री, पुरुष ग्राहकांना सावलीसाठी मंडप, बैठक साठी खुर्च्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय करावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना नागरी हित दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
कोरोना साथ आणि वाढत असलेला लॉक डाऊन यामुळे बँकेत नागरिकांची गर्दी होत असते. बँका सर्व कारभार हा ग्राहकांना बाहेर कडक उन्हाळा सुरू असतानाही उभे करून चालवत आहेत.यात जेष्ठ नागरिक व महिलांना उभे ही राहता येत नाही आणि बसायलाही काही सोय नसल्याने बसताही येत नाही.त्यामुळे तासन तास होणाऱ्या मोठ्या गैरसोयीने वयोवृद्ध नागरिक दगावण्याची शक्यता आहे. ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने बँकांना आदेश देऊन ग्राहकांसाठी काही सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आदि मागण्यांबाबतची चर्चा प्रांताधिकारी सिमा अहिरे यांचेशी नागरी हित दक्षता समितीचे प्रा.अशोक पवार, संदिप घोरपडे, चेतन शहा, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे आदिंनी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किराणा, दूध, भाजीपाला घ्यायला अनेक पर्याय नागरीकांना उपलब्ध असतात मात्र बँकेला पर्याय नाही म्हणून नागरिकांना बँकेत आल्यावाचून गत्यंतर नसते. तेव्हा बँकांनी महिला व वृद्ध नागरीकांसाठी सावलीकरिता मंडप टाकण्यासह सोशल डिस्टन्सिंग चे पालन करीत बैठक खुर्च्यांची सोय करण्यात यावी, पिण्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, ग्राहकांचे कमीत कमी वेळेत कोणतेही काम करता येईल का? याबाबत गांभीर्याने विचार करावा असे निवेदन करण्यात आले आहे. निवेदनावर बन्सीलाल आसाराम भागवत तसेच भास्कर रामचंद्र बोरसे यांच्याही स्वाक्षरी आहेत. यावेळी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी ग्राहकांची विशेषतः वृद्ध व महिलांची योग्य ती काळजी घेणे बाबत बँकांना सूचित करण्यात येईल असे याप्रसंगी झालेल्या चर्चेत सांगितले.