
जळगाव : येथील इकरा युनानी महाविद्यालयात सिनियर विद्यार्थ्यांनी २८ विद्यार्थ्यांना विवस्त्र करून सामूहिक रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तीन विद्यार्थ्यांची महाविद्यालयातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परभणी येथील मुदस्सर मुख्तार इनामदार (१९) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी पालकांनी मुदस्सर याला वसतिगृहात दाखल केले. यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता. सर्व विद्यार्थी रात्री महाविद्यालयाच्या आवारातील वसतिगृहात आपापल्या रुममध्ये होते. पहाटे दोन वाजता १५ ते २० सिनीयर विद्यार्थ्यांनी नव्याने दाखल झालेल्या २८ विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन रॅगिंग केले.
मुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्याप्रमाणे अॅक्टिंग करण्यास सांगून नंतर शिवीगाळ करीत एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेतली. मुदस्सरने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला व खिशातील १८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सरने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका करुन घेतली. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने मुदस्सरने पालकांना फोन करुन माहिती दिली. त्याचे वडील परभणी येथे होमगार्ड समादेशक म्हणून कार्यरत आहेत. पालकांनी विचारणा केल्यानंतर प्राचार्य डॉ. शोएब शेख यांनी घटनेची चौकशी करुन दोषी तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. मुदस्सरने पहाटे दिल्ली येथील राष्ट्रीय अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली असून प्राचार्य डॉ. शेख यांनी नव्याने दाखल झालेल्या २८ मुलांचे लेखी जबाब नोंदवून घेतले आहेत.