अमळनेर : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे सुटी घेवून गावी जात असताना चांदवड तालुक्यातील वडाळी भोई गावाजवळ १५० फूट खोल कार कोसळून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोरोना च्या काळात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर दोन दिवस सुटी घेवून ते नाशिक येथे आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी निघाले होते. खाजगी कारने स्वत: ड्रायव्हींग करत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली. झालेल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका ओळखीच्या इसमाने या अपघाताचे वृत्त गोशाळेचे संचालक चेतन शहा यांना कळविले. अमळनेर येथे वृत्त कळताच पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.