या प्रकरणी उच्चस्तरीय डिपार्टमेंटल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आमदार अनिल पाटील यांची मागणी

अमळनेर : कोरोना लॉक डाऊनमुळे वाहतुकीस काही निर्बंध असल्याचा फायदा घेत तालुक्यातील चोपडाई येथील जिल्हाच्या सीमा चेकपोस्टवरील पोलीस वाहनधारकांडून गैरप्रकारे पैसे उकळत असल्याची आणि याठिकाणी अनेकांची लूट होत असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांना मिळाली. विशेष म्हणजे रात्री हा प्रकार आमदारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी काढून संबंधित पोलीसांकडे चोपडाईच्या दिशेने धाव घेतली. मात्र प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी चेकपोस्ट वरील कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून आमदारांना जानवे गावाजवळ गाठले. तेथेच सर्वांसमक्ष आमदार पाटील यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
ते म्हणाले की, लॉकडाऊन च्या नावाखाली माझ्या जनतेची अशी कुणी अडवणूक व लूट करीत असेल तर ती मुळीच सहन केली जाणार नाही अशी तंबी देत पोलीस निरीक्षकांकडेही नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय डिपार्टमेंटल चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आमदार अनिल पाटील यांच्याकडे चोपडाई कोंढावळ येथील सीमाबंदी चेकपोस्ट वर पोलीसांकडून लूट होत असल्याची तक्रार अनेक नागरिक व वाहनधारकांनी केली होती. यानंतर काल रात्री टाकरखेडा येथील एक कुटुंब धुळे येथून अत्यावश्यक काम आटोपून वाहनाने येत असताना चोपडाई येथे त्यांना अडवून बराच वेळ ताटकळत ठेवले आणि एक पंटर मार्फत सोडण्याचे पैसे घेतले. संबंधितांनी आमदार अनिल पाटील यांना फोन वरून तक्रार केली, आमदारांनी त्या पोलीसाजवळ मोबाईल देण्याचे सांगितले असता संबंधित पोलीसाने नकार दिला. यामुळे आमदारांनी संतप्त होत आपले वाहन काढून चोपडाईचा रस्ता धरला. तोपर्यंत पोलीस निरीक्षक मोरेंना ही माहिती मिळाली असल्याने त्यांनीही आमदारांच्या मागे जाऊन त्यांना जानव्याजवळ गाठत समजूत काढली व पोलीस कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी बोलविल्यानंतर आमदारांनी चांगलेच धारेवर धरले.
चोपडाई कोंढावळ येथील सीमाबंदी चेकपोस्ट लुटीचा अड्डा झाल्याचा आमदारांचा आरोप
शासनाने लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता आणल्यानंतर तालुका अंतर्गत प्रवास सुरू झाला आहे, मात्र काही पोलीस कर्मचारी नाकाबंदी च्या नावाने विनाकारण लोकांची अडवणूक करतात. चोपडाई कोंढावळ येथील चेक पोस्ट वर दोन ते तीन तास काही वाहनांना थांबवून ठेवले जाते आणि पंटर मार्फत पैसे घेऊन सोडले जाते. अनेक जण धुळे येथे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेऊन जात असतात विशेष म्हणजे वाहनात संबंधित रुग्ण आणि फाईल सर्व असते. परंतु तरीही त्यांना पासेस च्या नावाने विनाकारण अडवून पैसे उकळले जातात. कुणी व्यावसायिक अंडे आणत असेल तर त्यांचे ट्रे उतरऊन ठेवले जातात, कुणाचा किराणा माल अथवा इतर साहित्य असेल तर त्याचीही लूट केली जाते असे अनेक किस्से याठिकाणी घडत असून एकीकडे कोरोना लॉकडाऊन मुळे जनता त्रस्त असताना अश्या पद्धतीने पोलीसांनीच जनतेची पिळवणूक करणे अयोग्य आहे, यामुळे याची गंभीर दखल मी घेतली असून वरिष्ठांशी देखील याबाबत बोलून तक्रार केली आहे, यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आपण केली असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.