‘गुगल मीट’ द्वारे मारवड बीटस्तरीय जि.प.मुख्याध्यापक ऑनलाइन मिटींग संपन्न

“वृक्षारोपण व शाळा बंद पण शिक्षण सुरु” या विषयाचा घेतला आढावा


अमळनेर : तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन यांचे अध्यक्षतेखाली आज दि.१३ रोजी दु.१२ वाजता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. जळगाव यांचेकडील सुचनेनुसार “वृक्षारोपण व शाळा बंद पण शिक्षण सुरु” या विषयी आढावा घेण्यासाठी ऑनलाईन मिटींग घेण्यात आली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख श्रीमती मंगलाताई पाटील, अशोक सोनवणे व भरवस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय सोनवणे यांंची प्रमुख उपस्थिती होती.

कोविड १९ प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रत्यक्ष शाळा सुरु नसल्या तरी शासनाच्या निर्देशासार दि.१५ जून पासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने शाळा बंद पण शिक्षण सुरु याबाबत बीटस्तरीय आढावा घेण्यात आला. यात, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, पाठ्यपुस्तक वितरण, पटनोंदणी, विद्यार्थी व्हॉटस् अप गृप इ. चा आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहणेसाठी शिक्षकांनी दररोज किमान १० ते १५ पालकांशी संपर्क साधून प्रगतीबाबत आढावा घ्यावा व शंकाचे निरसन करावे. तसेच पालकांना व विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करावे. यात प्रामुख्याने मास्कचा वापर, सुरक्षित शारिरीक अंतर, हात धुणे व स्वच्छतेबाबत अवगत करावे. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक महामारीच्या या आपत्तीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विविध अध्ययन अध्यापन पध्दतीचा अवलंब, ई-कंटेन्ट निर्मिती, रेडीओ, टि.व्ही., मोबाईल इ. सह दीक्षा ॲप चा वापर व प्रत्येक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहणेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चात्मक माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे दि.१५ जुलै ते ३० जुलै अखेर वृक्षारोपण पंधरवाडा साजरा करायचा असल्याने कोविड प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरक्षात्मक उपाय योजनेसह वृक्षारोपण पंधरवाडाचे नियोजन शालेय पातळीवर करुन जास्तीत जास्त संख्येने वृक्ष लागवड करणेबाबत सूचना देण्यात आल्या.

सदर ऑनलाईन मिटींगचे प्रास्ताविक दत्तात्रय सोनवणे यांनी केले व आभार विलास पाटील यांनी मानले. यावेळी मारवड बीटमधील मारवड, शहापूर व वावडे या केंद्रातील ३० जि.प.शाळांतील मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुख, विषयतज्ञ आदींनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली. ऑनलाईन मिटींग यशस्वीतेसाठी होस्ट म्हणून तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांचेसह विषयतज्ञ प्रमोद पाटील व डेटा एन्ट्री ऑपरेटर युवराज वाघ यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!