कोविड सेंटर मध्ये दाखल व्यक्ती तीन दिवसांपासून बेपत्ता ? माजी आमदार स्मिता वाघ यांनी इनसिडन्ट कमांडर ना विचारला जाब

बेपत्ता व्यक्ती शोधून बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मा.आ.स्मिता वाघ यांची प्रशासनाकडे मागणी.

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटर मध्ये दाखल एक व्यक्ती तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची त्यांच्या पुतण्याने माजी आमदार स्मिता वाघ यांचेकडे तक्रार केली आहे. आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत माजी आ.स्मिता वाघ यांनी इनसिडन्ट कमांडर नात्याने उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांना जाब विचारला आहे. कोविड सेंटरमधील ६८ नंबरच्या खोलीत ही व्यक्ती दाखल होती. गेल्या तीन दिवसापासून स्वॅब घेण्यापूर्वीच बेपत्ता झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. संबंधित रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच गायब झाल्याने आमदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाला जाब विचारीत नाराजी व्यक्त केली. या कोविड सेंटरला पोलीस बंदोबस्त असताना देखील या ठिकाणाहून व्यक्ती बेपत्ता कशी होते ? याचा जाब त्यांनी इनसिडन्ट कमांडर यांना विचारला आहे.

याबाबत कळालेली माहिती अशी की, दि.६ रोजी मंगेश दगडू वाणी यांचेसह पत्नी व मुलगा यांची तपासणी करण्यात आली यात, पत्नी कोरोना पॉझिटीव्ह तर ते स्वत: व मुलगा निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परिवारातील सदस्य बापू निंबा वाणी कामावर गेल्याने दि.९ रोजी मंगेश वाणी यांनी तपासणी साठी त्यांना कोविड सेंटरला दाखल करून त्याची नोंदणी केली व रूम नं. ६८ मध्ये बसवून आले होते. दि.११ रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते शनिवार दुपारपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मंगेश वाणी यांनी विचारले असता, तेथे कार्यरत असणाऱ्यांनी बंदोबस्त ठेवण्याचे काम पोलीसांचे आहे असे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगेश वाणी यांनी माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्याकडे तशी लेखी तक्रार दिली. त्यावरून स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे तक्रार करून इनसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. प्रताप महाविद्यालयातून बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता असून देखील वृद्ध बाहेर जातो कसा ? पोलीसांचे लक्ष नव्हते की पोलीस बंदोबस्ताला नव्हते ? प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यापूर्वी देखील काही रुग्ण दाखल असताना घरी निघून जात होते. जळगाव येथे जसा प्रकार घडला तसा घडू नये म्हणून प्रशासनाने ताबडतोब बेपत्ता व्यक्तीचा शोध घेवून बेजबाबदार कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असल्याचे प्रांताधिकारी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!