
अमळनेर : येथील जुना पारधीवाडा परिसरात राहणाऱा जगदीश नारायण पाटील ( वय २४) हा तरुण गलवाडे रस्त्यावरील श्रध्दानगर भागात ता.१५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास पथदिवे बसवित असतांना विजेचा शॉक लागून खाली पडला. परिसरातील नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. कामासाठी विजपुरवठा खंडीत केलेला होता मात्र अचानक कोणीतरी विजपुरवठा सुरु केल्याने ही घटना घडल्याचे कळते.
पुण्याच्या मॅक्स ब्राईट प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला नगरपालिकेने पथदिवे देखभालीचा ठेका दिलेला असून सदर ठेकेदाराकडे जगदीश पाटील हा अस्थायी स्वरुपात काम करीत होता. जगदीशचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांना जगदीशचा हातभार लागत असे. त्याचे पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. नगरपालिकेने मृत व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनिल हटकर करीत आहेत.