सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन, अमळनेर तर्फे कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक ऑनलाइन वेबिनार संपन्न

‘गुगल मीटद्वारे’ डॉ.गणेश पाटील यांनी दिला “कोरोना काळातील आरोग्याचा मूलमंत्र”

अमळनेर : येथील सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महामारी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जाणीव-जागृती बाबत अनोख्या सामाजिक उपक्रमाचे नुकतेच रविवारी आयोजन करण्यात आले. गुगल मीटद्वारे ‘कोरोना काळातील आरोग्याचा मूलमंत्र’ या विषयावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभागाचे मेडीकल ऑफिसर डॉ.गणेश पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शनाने ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. या वेबिनारला अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, अध्यापक विद्यालय जळगावचे प्राध्यापक आर.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या वेबिनारमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? याबाबत डॉ.गणेश पाटील यांनी उपयुक्त व चर्चात्मक माहिती दिली. ऑनलाईन वेबिनारमध्ये ते प्रत्यक्ष संवाद साधत असल्याचा अनुभव आला. कोविडमुळे आपली जीवनशैलीच बदलली असुन घरातून बाहेर पडतांना मास्कचा वापर अत्यावश्यक आहे. यासाठी वापरात असलेल्या वेगवेगळ्या मास्कची प्रात्यक्षिक स्वरुपात माहिती देऊन मास्कच्या योग्य वापराबाबत व उपयुक्ततेबाबत काही टिप्स दिल्या. तसेच गर्दीत जाणे टाळून अत्यावश्यक असेल तरच सुरक्षित उपाययोजना करुनच बाहेर पडावे. तसेच वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, इम्यूनिटी वाढीची औषधी इ.बाबत मार्गदर्शन करतांना आपल्या वैद्यकीय शिक्षणातील आवडीच्या व भारतीय संस्कृतीचा विशेष घटक असलेल्या आयुर्वेदाच्या पाच अंगाना स्पर्श करुन आपला आहार, विहार, निद्रा, दिनचर्या व व्यायाम इ.बाबत सखोल मार्गदर्शन डॉ.पाटील यांनी केले. शेवटी श्रोत्यांच्या मनातील आरोग्यविषयक शंका व समस्यांवर प्रश्नोत्तरात्मक सत्र घेण्यात आले. यात डी.ए.धनगर, विजय पाटील, अनिल पाटील, भटू लांडगे, कैलास पाटील, शरद पाटील, दिनेश मोरे, आर.एस.सोनवणे यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊन सर्वांसाठी आरोग्याचा मूलमंत्र दिला.

सदर ऑनलाईन वेबिनारचे प्रास्ताविक जयेशकुमार काटे यांनी केले. अशोक पाटील यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रेमराज पवार यांनी केले. यावेळी अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील शिक्षक, पालक व डॉक्टर यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सुमारे शंभर जणांनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवली. ऑनलाईन मिटींग यशस्वीतेसाठी होस्ट म्हणून तंत्रस्नेही शिक्षक तथा सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच गृपचे समन्वयक दत्तात्रय सोनवणे, विचारमंचचे प्रसिध्दी प्रमुख उमेश काटे यांचेसह शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!