महावितरणने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा
अमळनेर : ढेकू रोड व पिंपळे रोड परिसरातील काही विजेचे खांब जीर्ण होवून धोकादायक बनत चालले आहेत, असे खांब काढून त्याजागी नवीन खांब बसवण्यात यावेत यासाठी नगरसेवक श्याम पाटील यांनी महावितरण ला पत्र पाठवले आहे.
पत्रात नमूद केले आहे की, नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मधील ढेकू रोड व पिंपळे रोड भागातील काही भागात विजेचे खांब वाहतुकीस अडथळा बनतात तसेच काही भागातील खांब हे जीर्ण झाल्यामुळे अनेक अपघात आतापर्यंत घडले आहेत. पावसाळ्यात काही भागातील खांब वाकलेले आढळून आल्यामुळे वाऱ्यात ते पडून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होऊ शकते. परिसरातील काही भागांमध्ये विजेच्या खांबांमधील अंतर २०० फुटा पेक्षा जास्त असल्याने तारांचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याने मोठी दुर्घटना घडू शकते तरी अशा ठिकाणी नवीन विजेचे खांब टाकण्यात यावेत. काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील असे पत्रात नमूद केले आहे. महावितरणने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशाराही नगरसेवक श्याम पाटील यांनी दिला आहे.