खासदार उन्मेषदादांनी केली माजी आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीची मागणी पूर्ण

अमळनेर : देशात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शासन स्तरावर आवश्यक विविध सुविधा दिल्या जात आहेत. कोरोना चे होणारे संक्रमण पाहता, अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुविधा पुरविण्यात अडचणी येत होत्या. रुग्णालयात व्हॅन्टिलेटर उपलब्ध नसल्याने रुग्णांना जळगांव येथे रवाना करावे लागत होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयातच व्हॅन्टिलेटर उपलब्ध करुन मिळावेत अशी मागणी लावून धरली होती. त्यास अनुसरून खासदार उन्मेषदादा पाटील यांचे प्रयत्नांतून अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी पी.एम. केअर फंडातून तात्काळ पाच व्हॅन्टिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. याबद्दल माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी भ्रमणध्वनीवरुन खासदार उन्मेषदादा यांचे आभार मानले. शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी, नगरसेवक धनुभाऊ महाजन, बाळासाहेब संदानशिव यांनी प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत. याप्रसंगी पारोळ्याचे नगराध्यक्ष करणदादा पवार देखील उपस्थित होते.
