पोलीस पाटील लांडगे यांच्या वारसांना शासनाने पन्नास लाख रुपयांची मदत व पाडळसे धरणाला निधीची केली मागणी

अमळनेर : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस पाटील लांडगे यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची मदत शासनाने करावी व पाडळसे धरणाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे खासदार सुप्रिया सुळे यांची प्रा.अशोक पवार यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेतली.
तालुक्यातील पोलीस पाटील उल्हास नामदेव लांडगे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांनी जवखेडे चेकपोस्टवर पोलीसां समवेत रात्रंदिवस सेवा देत होते. जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे ते सचिव होते. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या वारसाला राज्य शासनाने पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करावी, असे सदर निवेदनात नमूद केले आहे. तसेच पाडळसरे धरणाला केंद्र सरकार च्या माध्यमातून पैसे मिळाले तरच धरण पूर्ण होईल. अशा परिस्थितीत शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नसल्यामुळे प्रा. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन चर्चा करण्यात आली. वरील दोन्ही प्रश्नांसंबंधी त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. याप्रसंगी प्रा.अशोक पवार यांच्यासह बन्सीलाल भागवत, मोरे क्रांती संघटना सदस्य वेदांशू पाटील, शुभम निकम उपस्थित होते.
