गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी सहविचार सभा संपन्न

अमळनेर : येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील जी. एस. हायस्कूलच्या सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या उपस्थितीत नुकतीच सहविचार सभा पार पडली. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजलेला आहे. यासाठी शासन व प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी शासन नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. गर्दी न करता, सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व न देता आरोग्यविषयक जनजागृती करून त्यातून प्रबोधन करत गणेशोत्सव साजरा करावा. पर्यावरण पूरक मुर्ती असावी. गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी नगरपालिकेची परवानगी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी अशा मार्गदर्शक सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी दिल्या.

पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनीही काही सूचना केल्या. कलम १४४ अन्वये जमाव बंदी आदेश कायम आहे. गणेश मंडळांनी उत्सवातील नियमांचे पालन करावे. गणपतीची मूर्ती चार फूटापेक्षा मोठी नसावी. सजावटीचा खर्च कमी करून आरोग्य विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करावे. मंडळातील सदस्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कंटेनमेन्ट झोनमध्ये गणपती उत्सवाला मनाई आहे. ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात यावी. प्रत्येक प्रभागात एकच गणपती बसवावा. खर्चाला फाटा देत कोव्हिड सेंटरला मदतीसाठी सहकार्य करावे असे सांगितले. मिळालेल्या सूचना लक्षात घेत, कोव्हिड सेंटरमधील रूग्णांना मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने एक दिवसाचे जेवण दिले जाईल, असे बापू वाणी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शरद पाटील यांनी केले. सहविचार सभेस गणेश मंडळाचे पदाधिकारी, गणेश भक्त उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!