नागरी हित दक्षता समितीच्या आंदोलनामुळे गरीब कुटुंबांचा प्रलंबित प्रश्न निकाली

आमदार अनिल पाटील, मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याहस्ते जागेवरच ७/१२ उतारे देवून आंदोलनाचा समारोप

अमळनेर : येथील शहर तलाठी कार्यालयाच्या मनमानी कार्यपद्धती व निर्णय प्रक्रियेच्या निषेधार्थ तसेच सामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्नांबाबत नागरी हित दक्षता समितीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर नुकतेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आमदार अनिल पाटील, मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याहस्ते पिडीत महिलांना जागेवरच ७/१२ उतारे देवून आंदोलनाचा समारोप करण्यात आला. अमळनेर नागरी हित दक्षता समितीच्या आंदोलनामुळे गरीब कुटुंबांचा दोन वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाला आहे.

आत्मक्लेश आंदोलनात समितीचे प्रा.अशोक पवार, मा.अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी, संदिप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा.लिलाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी.एम.पाटील, भास्कर बोरसे, सुनिल अहिरराव, मगन पाटील, आर.एल.पाटील, ए.के.धनगर, प्रकाश पाटील, भटू जगताप आदींसह पिडीत महिला लताबाई राजेश पाटील, जिजाबाई शांताराम पाटील सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी तहसीलदार मिलिंद वाघ, प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी भेट दिली. दरम्यान, प्रांताधिकारी कार्यालयात शहर तलाठी कार्यालयाच्या कार्यपद्धती व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत आमदार अनिल पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रा.अशोक पवार, मा.अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी, भागवत गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अमळनेर येथील लताबाई राजेश पाटील तसेच जिजाबाई शांताराम पाटील यांचे मालकीचे प्लॉट चे खरेदी खत व सूची २ तसेच प्रांत कार्यालयाने २००३ मध्ये नियमाकुल केलेले असतांनाही १७ वर्षांपासून सदर महिलांच्या नावे उतारा मिळत नव्हता म्हणून नागरी हित दक्षता समितीच्या वतीने १ ऑटो. २०१८ रोजी शहर तलाठी अमळनेर यांना अर्ज करण्यात येवून समितीचे प्रा.अशोक पवार व सहकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केला. तहसीलदार यांचेसोबत चर्चाही केली. मात्र, सदर महिलांना शहर तलाठी कार्यालायाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर नागरी हित दक्षता समितीतर्फे मा.अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी यांच्या नेतृत्वाखाली २० ऑगस्ट पासून तहसील कार्यालय येथे आत्मक्लेश आंदोलन जाहीर करण्यात आले होते. या आंदोलनामुळे गरीब कुटुंबांचा दोन वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आज निकाली निघाल्याने आंदोलनाचा यशस्वी समारोप झाला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!