शासकीय रुग्णालयातील ‘देवदूत’ डाॅ. कपिल पाटील करीत आहेत मनोबल वाढविण्याचे काम

शिरपूर : शहर व तालुक्यात आता ‘कोरोना’ ने आता आपले आक्राळ विक्राळ रुप धारण केले आहे. तालुक्यातील प्रत्येक खेड्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. यामुळे शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करणार्या रुग्णांची संख्या आता दररोज वाढत आहे. तपासणी करतांना रुग्णालयातील डाॅक्टर देखील कोरोना बाधित होत आहेत. साहजिकच प्रशासनाची चिंता वाढली आहे.

अशा खडतर परिस्थितीत कोरोना तपासणी साठी येणाऱ्या व रोगाची भिती निर्माण झालेल्यांचे मनोबल वाढविण्याचे काम याच रुग्णालयातील ‘देवदूत’ डाॅ. कपिल पाटील करीत आहेत. अत्यंत गोड भाषेत व काव्यातुन डाॅ.कपिल पाटील हे कोरोनाच्या भितीने ग्रासलेल्या व्यक्तिला मानसिक आधार देत त्याचे मनोबल वाढवित आहेत. तर एखाद्या व्यक्तिला जर उपचारा बाबत काही शंका असल्यास त्याच्या शंकेचे निरसनही करीत आहेत. ‘आयुष्याशी अजून करार माझा बाकी आहे.. मावळण्याआधी लखलखण्याचा विचार अजून जारी आहे’ अशा सुंदर काव्यातून ते रुग्णांना धीर देत आहेेत. प्रशासन गेल्या सहा महिन्यांपासून या कोरोना संक्रमणाशी झुंज देत आहे. प्रशासन हतबल झाले असून जनता देखील आता शासनाच्या व वैद्यकीय प्रशासनाच्या आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे. आपल्यासोबत दुसर्याच्या जीवाचे रक्षण करणे आपल्या हाती आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणा हे जीवतोड मेहनतीने काम करीत असले तरी जनतेने आपली नैतिकता म्हणुन आपले व आपल्याच शहर व तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अनर्थ घडेेल.
