अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचा निर्णय

अमळनेर : येथील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन कार्यक्रम मराठी वाड्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहात नुकताच पार पडला. माजी आ.डॉ.बी.एस.पाटील, श्रीमती स्मिता वाघ, न.प.च्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार पंडित चौधरी, महेश देशमुख, चेतन राजपूत आदी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत यावेळी करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार बैठकीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जपण्यासाठी तीन ठराव संमत करण्यात आले. याबाबत शासनाला निवेदन देऊन मागण्यांचा सर्व स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात, १) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार तथा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालय व शाळांमध्ये लावावी. २) पुढील वर्षी वरील सर्व ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करावी. व ३) शालेय पाठ्यपुस्तकात बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्यावर धडा घेण्यात यावा या संघाच्या मागण्या आहेत. याचवेळी राजेंद्र पोतदार यांनी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चेतन राजपूत व सचिव पदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्याची सूचना मांडल्याने सर्वानुमते ही फेरनिवड जाहीर करण्यात आली. पत्रकार भवनाच्या पूर्णत्वासाठी आमदार अनिल पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, मा.आ.साहेबराव पाटील, मा.आ.शिरीष चौधरी यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. अमळनेर पत्रकार भवन निर्मितीसाठी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून सुमारे आठ कोटी किमतीचा भूखंड दिला असून त्याठिकाणी कंपाऊंड चे काम सुरू झाले आहे. तेथे लवकरच भव्य पत्रकार भवन उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय आगामी न.प.च्या सभेत बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा न.प.कार्यालयात व शाळांमध्ये लावण्याचा ठराव करण्याची विनंती नगराध्यक्षा व सदस्यांना करू अशी ग्वाही दिली. मा.आ.शिरीष चौधरी यांनी देखील अमळनेरात पत्रकार भवन व्हावे हे आपले स्वप्न होते, त्याचे भूमिपूजन देखील आपण करून निधीची तरतूद केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे भवन उभे राहणारच आहे मात्र विरोध करणाऱ्यांना देखील पत्रकार बांधवांनी लक्षात ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकार भवनास चालना दिल्याबद्दल शिरीष चौधरी व कृषिभूषण पाटील या दोन्ही मान्यवरांचा सत्कार पत्रकार संघातर्फे करण्यात आला. तर दगडी दरवाजाचा अडचणीचा प्रश्न आमदार अनिल पाटील यांच्या सहयोगाने सोडविल्याबद्दल कृषिभूषण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच बाळशास्त्री जांभेकर यांचा सन्मान करणारे ठराव झाल्याने कौतुक करत माजी आ.स्मिता वाघ व डॉ.बी.एस.पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक रणजित शिंदे आदींनी आपल्या संस्थेमार्फत या ठरावाप्रमाणे मागणी करण्याची ग्वाही दिली. यावेळी विशेष कामगिरी तथा विविध पदांवर वर्णी लागल्याने संजय पाटील, राजेंद्र पोतदार, जितेंद्र ठाकूर, बाबूलाल पाटील, हिरालाल पाटील, संभाजी देवरे, पक्षीमित्र सुनिल भोई आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, सरपंच परिषद तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, न.प.चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी, न.प.पतपेढी चे चेअरमन सोमचंद संदानशिव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजप सरचिटणीस राकेश पाटील, सानेगुरुजी स्मारक समितीच्या दर्शना पवार, गुप्तवार्ताचे डॉ.शरद पाटील, ग्रामसेवक संघटनेचे दिनेश साळुंखे, नगरसेवक प्रवीण पाठक, बाळा संदानशिव, अनिल महाजन यासह असंख्य मान्यवरांनी भेटी देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान केला. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पोतदार, संजय पाटील, महेंद्र रामोशे, जितेंद्र ठाकुर, योगेश महाजन, आबीद शेख, मुन्ना शेख, काशिनाथ चौधरी, विनोद खैरनार, विजय पाटील, हिरालाल पाटील, डॉ विलास पाटील, महेंद्र पाटील, सदानंद पाटील, संभाजी देवरे, बाबूलाल पाटील, वसंत पाटील, समाधान मैराळे, संजय मरसाळे, श्यामकांत पाटील, गजानन पाटील, अरुण पवार, संजय सुतार, गौरव पाटील, संजीव पाटील, संजय सूर्यवंशी, रोहीत बठेजा यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
