
जळगाव : भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन पोलीस सेनेत कार्यरत असलेल्या सुनिल यशवंत हिरे (वय ४०) या जवानाला सेवा बजावताना वीरमरण आले होते. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या मूळगावी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
जवान सुनिल यशवंत हिरे यांना मंगळवारी सेवा बजावत असताना वीर मरण आले ते सध्या आसाम येथे कार्यरत होते. गुरूवार (ता.२४) रोजी खेडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच खेडगाव येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देत जवान सुनील हिरे यांच्या निधनाबद्दल दुख: व्यक्त केले. यावेळी आमदार किशोर पाटील, डाॅ. विलास पाटील, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
