पुण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेला लागण

पुणे : कोरोना संकटाचा सामना करावा लागत असतानाच आता महाराष्ट्र राज्यात नव्या विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसची लागण झालेलं राज्यातील हे पहिलं प्रकरण ठरलं आहे. केरळमध्ये झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात झिका विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे आढळला आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यासंदर्भातील ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून, तो १९४७ साली युगांडा देशातील काही माकडांमध्ये आढळला. त्यानंतर १९५२ साली युगांडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फॅलिव्हायरस प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरतो.
