जळगाव जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील यांचा समावेश

नवी दिल्ली : १२ मे रोजी ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. सन १९७३ पासून आरोग्य क्षेत्राचा कणा असणा-या परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रात आरोग्य सेवेत असलेल्या प्रेमलता संजय पाटील यांचाही समावेश आहे. कोरोना महामारीची साथ सुरू असल्यामुळे यावर्षी १२ मे रोजी हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दुरस्थ प्रणालीच्या माध्यमातून बुधवारी सायंकाळी एकूण ५१ परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. पदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यात, महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश आहे. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुंटुब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.
मागील १४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील जळगाव खुर्द येथील उपकेंद्रात आरोग्य सेवेत असलेल्या प्रेमलता संजय पाटील या ऑग्जिलिएरी नर्स मिडवाइव्स (एएनएम) म्हणून कार्यरत आहेत. त्या महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत असणारी कामे त्यांनी चोख पार पाडली आहेत, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे. श्रीमती कुमरे आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडतात. आपत्कालिन जीवन रक्षात्मक प्रणाली (Emergency life saving machine ) त्या सक्षमपणे सांभाळतात. यासह त्या नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावत आहेत. आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्वाचा भाग असणाऱ्या ‘अवयव दान’ क्षेत्रातही त्या काम करतात.
