भाजपच्या सर्व ५० नगरसेवकांनी आपली एकजूट दाखवली.

धुळे : येथील महानगरपालिका महापौर पदासाठी नुकतीच दि.१७ रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे उमेदवार प्रदीप कर्पे विजयी झाले. ते भाजपच्या सर्व ५० नगरसेवकांची मते घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना व अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. काँग्रेस व एमआयएमने निवडणूक लढवली. या प्रक्रियेत ७३ नगरसेवकांनी ऑनलाईन मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे सर्व ५० नगरसेवकांनी आपली एकजूट दाखवून दिली. काँग्रेसच्या मदिना पिंजारी यांना १७ मते तर एमआयएम चे अन्सारी सईदा इकबाल यांना ०४ मते मिळाली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवार तटस्थ राहिल्या. बसप उमेदवारही तटस्थ राहिल्या.

महापौरपदाच्या या निवडणुकीत भाजपाला झटका बसेल व शिवसेनेचा महापौर होणार अशी चर्चा होती. मात्र ती चर्चा एक अधुरे स्वप्नच राहिले. भाजपने एकजूट दाखवून महापौर पदी प्रदीप कर्पे यांची निवड केली. या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर शर्मा यांनी कर्पे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली.
