
एरंडोल : तालुक्यातील आडगांव येथे कै.कौतिक दगडू पाटील (स्वातंत्र्य सैनिक) यांच्या १५ व्या पुण्यतिथी स्मरणार्थ गावातील तरुणांसाठी नुकतेच स्पर्धा परीक्षा, उद्योग व कृषी या विविध विषयांवर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगावचे पोलीस अधिक्षक वासुदेव देसले, पुणे येथील उद्योजक महेंद्र पाटील, अमळनेर महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.श्याम पवार, मुंबई येथील कस्टम ऑफिसर गोकुळ पाटील, निवृत्त कृषी अधिकारी सुधाकर पाटील, खेडी येथील आदर्श शेतकरी विलास शिंदे, खेडगाव येथील साळुंखे साहेब, निवृत्त शिक्षक मधुकर पाटील, पोलीस पाटील नितीन पाटील, स्पर्धा परिक्षेचे समन्वयक विजयसिंग पवार उपस्थित होते. सुरुवातीला कै.कौतिक दगडू पाटील (स्वातंत्र्य सैनिक) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी तरुणांना स्पर्धा परिक्षा, उद्योग, शेतीविषयक योजनांची माहिती आदी विषयांवर बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन एन.के.पाटील यांनी केले. यावेळी ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.