अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी केली जागेची पाहणी

अमळनेर : शहरात लवकरच नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे यासाठी शासन स्तरावरून हालचालीना वेग आला असून शहरातील पाच पावली मंदिराजवळील पोलीस लाइन च्या जागेवर महसूल ची नवीन प्रशासकीय इमारत व्हावी यासाठी आमदार अनिल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी नुकतीच अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी केली.
जनहिताच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाची प्रशासकीय इमारत तसेच इतर कार्यालये एका ठिकाणी असणे गरजेचे असल्याने शहरात लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
या कामासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी अधिवेशनात १४ कोटी १७ लाखांची मान्यता देखील दिलेली आहे. पण, त्यासाठी यापूर्वी महसूल विभागाकडून ज्या जागेची निवड केली गेली होती. ती जागा शहराबाहेर असल्याने सर्वसामान्य लोकांची गैरसोय होऊ शकते. यासाठी मंत्रालयीन बैठकीत शहरात असलेल्या पाचपावली चौकातील जुन्या पोलीस लाईनच्या जागेचा प्रस्ताव मांडलेला आहे.
अमळनेर तालुक्याचे कार्यक्षेत्र पाहता, शहर व तालुका पोलीस स्टेशन स्वतंत्र असावेत ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सद्यस्थितीत पोलीस स्टेशन शहरापासून ३ ते ४ किलोमीटर च्या अंतरावर असून त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देखील उपलब्ध करून दिली आहेत. मारवड पोलीस स्टेशन च्या माध्यमातून ग्रामीण चा काही भाग सांभाळण्यास मदत होत असते. मात्र गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने आता शहरात स्वतंत्र शहर पोलीस स्टेशन ची मागणी जोर धरू लागली आहे. याचाच भाग म्हणून हल्लीच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेवर शहर पोलीस स्टेशन उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. शहर पोलीस स्टेशन झाल्यास गुन्हेगारीवर वचक बसेल. शहरातील जुन्या पोलीस लाईनची जागा महसूल विभागाला मिळावी यासाठी पोलीस विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. यावर मंत्रालयीन स्तरावर चर्चा करून गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त महासंचालक यांनी शहराला भेट देऊन आढावा घेतला. याबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून मंत्रालयीन बैठकीत सादर केला जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश चोपडे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावल, प्रांताधिकारी सीमा अहिरे आदी उपस्थित होते.