खानदेश साहित्य संघ, अमळनेेर शाखेच्या वतीने ‘कविता काळजातल्या’ काव्यमैफिल रंगली

अमळनेेर : खानदेश साहित्य संघ, अमळनेेर शाखेच्या वतीने येथील गं.स.हायस्कूल च्या आय.एम.ए. हॉल मध्ये नुकतेच निमंत्रित कवींचे ‘कविता काळजातल्या’ काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते काव्य मैफिलीचे उद्घाटन झाले. निमंत्रित कवींमध्ये प्रसिद्ध लोककवी, सिनेगीतकार प्रा.प्रशांत मोरे, धुळ्याचे कवी प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी, करणखेड्याचे कवी शरद धनगर, लोंढव्याचे कवी डॉ.कुणाल पवार यांचा सहभाग होता. काव्यरसिकांच्या भरगच्च उपस्थितीत निमंत्रित कवींनी आपल्या मराठी व अहिराणी कवितांच्या या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित काव्यरसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

कवी प्रशांत मोरे यांच्या ‘माय’ कवितेतील ‘तुझा हात परीस… माझा लोखंडी ग झुला.., हात परीस लागला… झुला सोन्याचा झाला..’ या ओळींनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले. ‘गहू दयस.. बाजरी दयस…’ ह्या अहिराणी गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांच्या ‘जग दुन्यानी नजर म्हान मी येडाम्हाना शे भााऊ.. अहिराणी मन्ही भाषा आनी नी खेडाम्हना शे भाऊ’ या कवितेने ग्रामीण चित्र समोर आणले. कवी डॉ.कुणाल पवार यांनी ‘माय मनी तू खटला म्हानी.. तून्ह कष्ट कधी नई सरस वं.. तून्हाज पोटे माले सात जलम दे.. हाई नसीब मन्ह म्हणस वं…’ ही कविता सादर केली. सोबतच ‘तिला पाहिल्यावर सुचावी गझल.. दुराव्यात सोबत असावी गझल, हृदय धडधडावे सखीचे तिथे.. अशी काळजातून यावी गझल…’ ही गझल सादर केली. कवी शरद धनगर यांनी ‘माय मुक्ताईना राग.. माय तुकोबाना त्याग, माय दयतांना व्हस ओवी.. अभंग ना भाग…’ ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सोबतच ‘तुझ्याशी जरी जन्मभर वाद केले.. सखे मी मनोमन तुला याद केले…’ ही गझल सादर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी तर आभार दत्तात्रय सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास काव्य रसिकांची मोठी गर्दी होती. वाल्मिक मराठे व विपीन पाटील यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खान्देश साहित्य संघ, अमळनेरच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!