संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या वतीने मुंदडा नगर-१ भागातील नागरी समस्यांबाबत न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन

अमळनेर : शहरातील मुंदडा नगर-१ या भागात रस्ते, गटारी आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या विविध नागरी समस्या निर्माण झाल्याने त्या सोडविण्यासाठी येथील महिला भगिनींना नगरपरिषदेत धाव घेऊन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना नुकतेच संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्यांचा पाढा मांडला.

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नियमित पालिकेचा कर भरणा करीत असूनही पालिकेच्या सोयी सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. प्रामुख्याने या भागातील रस्ते नादुरुस्त असल्याने व गटारी नसल्याने कॉलनी वासियांची येता-जाताना सांडपाण्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते. गटारी नसल्याने अनेक ठिकाणी पाणी उघड्यावर साचत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी डबके साचून अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत, पडल्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत ही झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढून आता पावसाळ्यात तर या भागाचे अतिशय हाल झाले असून पूर्ण रस्ता नादुरुस्त असल्याने त्यावर चिखल व पाणी माखून घराबाहेर निघणेच कठीण झाले आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी पालिकेने खुल्या भुखंडात उद्यानाचे निर्माण केले असून याठिकाणी पालिकेकडून नियमित स्वच्छता न राखली गेल्याने झाडे झुडपे वाढून सर्वत्र प्रचंड घाण झाली आहे. यामुळे परिसरात विषारी सर्पाचा वावर वाढून अनेकदा सर्प रस्त्यावर तसेच घरात प्रवेश करतात, यामुळे परिसरात जीवाला धोका निर्माण झाला आहे. सायंकाळी भीती पोटी नागरिक घराबाहेर सुद्धा निघत नाहीत. एखादया वेळी लहान मूल येता जाताना सर्पामुळे काही विपरित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण स्वता: एकदा आमच्या परिसरात फेरफट‌का करून आमचे होणारे हाल प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावे व वरील समस्यांपासून आम्हाला मुक्त करावे अशी आग्रही मागणी वजा विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षा वैशाली शेवाळे, परिषदेच्या तालुकाध्यक्ष वर्षा पाटील, मनिषा महाजन, ललिता चौधरी, वर्षा पाटील, शिवाजी पाटील, निलेश पगारे आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!