मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे शानदार उद्घाटन संपन्न

मला मराठी भाषेचा नितांत अभिमान : फैय्याज शेख

अमळनेर : येथील मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा. र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सुप्रसिद्ध नाट्य कलावंत तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माजी अध्यक्षा फैय्याज शेख यांनी मुलाखतीतून गुंफले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, कादंबरीकार अशोक समेळ यांनी मुलाखत घेतली. पहिले पुष्प गुंफताना ‘याला जीवन ऐसे नाव’ हा त्यांचा विषय होता. मराठी भाषेविषयी मत मांडताना मराठी भाषेचा नितांत अभिमान असल्याचे फैय्याज शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक तथा खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.अनिल शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हरी भिका वाणी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय शरद सोनवणे, प्रा.श्याम पवार यांनी करुन दिला. सर्वप्रथम दिवंगत साहित्यिक, लेखक, कवी, नाट्यकर्मी, सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. व्याख्यानमालेचे उद्घाटक डॉ.अनिल शिंदे यांनी आपल्या मनोगतात अमळनेेर नगरीतील साहित्यिकांचा वारसा उलगडला. राजकारणावर बोलताना ‘काय ती झाडी, काय ते हॉटेल…’ म्हणत टिप्पणी केली. यानंतर उपस्थित मान्यवर व देणगीदारांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ.अविनाश जोशी यांनी दोन वर्षांनंतर होणारा हा सोहळा कोरोना काळात मृत्यू झालेल्यांना अर्पण केला. मराठी वाड्मय मंडळाचा हा वारसा जोपासण्यासाठी विनंती केली व या कार्यक्रमाचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याचे सांगत लवकरच अमळनेर खान्देश साहित्य संमेलन घेण्याचा मानस बोलून दाखविला.

मुलाखतीस सुरुवात करतांना सुप्रसिद्ध नाट्य कलावंत तथा अ.भा.नाट्य परिषदेच्या माजी अध्यक्षा फैय्याज शेख यांनी ‘शारदा स्तवन’ म्हटले. मराठी भाषेविषयी मत मांडताना मराठी भाषेचा नितांत अभिमान असल्याचे सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील फैय्याज शेख यांचा ‘महाराष्ट्र कन्या’ म्हणून गौरव केल्याचे मुलाखतकार अशोक समेळ यांनी सांगितले. मुलाखतीत एकामागून एक प्रश्न विचारत फैय्याज शेख यांचा जीवनपट उलगडला.

अभिनयाची सुरुवात कशी झाली व पहिला अभिनय कोणता ?…. गणेश उत्सवातून अभिनयाची सुरुवात केली असून ‘तुझे आहे तुजपाशी’ हे पहिले नाटक. कोरोना काळात आपली भूमिका काय ? …. सन २०१७ पासून वयोमानामुळे अभिनय बंदच मात्र गायन सुरुच आहे. कोरोनाची अडीच वर्षांनंतर हा पहिला मोठा कार्यक्रम असल्याचे सांगितले. संस्कार कोणाकडून मिळाले ?… या प्रश्नावर कदाचित गर्भसंस्कार व मिळालेली परमेश्वरी देणं.. यातूनच जीवन फुलत गेले असे फैय्याज सांगतात.

प्रा.वसंत कानेटकरांच्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकात प्रभाकर पणशीकर या कलाकारासोबत निलम ची भूमिका साकारली. १९६६ साली गायिलेलं गाणे ‘लाखोंके बोल सहे, सितम तेरे लिये…’ फैय्याज यांनी गायिले. विद्यानंद व सुमित्रा यांची भूमिका मांडत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सन १९६७ मधील ‘कट्यार काळजात घुसली’ चे पाचशे प्रयोग झाले. अनेक पात्र बदलले मात्र वसंतराव देशपांडे, पणशीकर, फैय्याज हे शेवटपर्यंत राहिले. सगळ्यांचे ऐकायला पण बेगम अख्तर गायला आवडते असे सांगून जोगीया काव्य सादर केले. ‘वीज म्हणाली धरतीला’ या कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या महाकाव्यात ‘सुधा करमरकर’ आणि ‘फैय्याज शेख’ ह्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यात फैय्याज ह्यांनी ‘जुलेखा’ हे स्त्री पात्र साकारले आहे. तेव्हा झालेल्या अपघाताचा किस्सा… रस्त्यावरील एका ने माणूसकी दाखवून दवाखान्यात दाखल केले.. “याला जीवन ऐसे नाव.”

शेवटी अभिनेता अशोक समेळ म्हणाले की, सकारात्मक दृष्टीने विचार केला तर त्रास होत नाही. लिखाण करताना लेखक व दिग्दर्शक बनतो. प्रेक्षकांना काय हवे ते काम दिग्दर्शकाला करावं लागतं. गुंतता हृदय हे व नटसम्राट मधील अभिनय सादर केला. नटसम्राट नाटकातील ‘जगावं की मरावं…’ हे प्रसिद्ध स्वगत म्हटले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. प्रा.श्याम पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!