शारदीय व्याख्यानमालेत निष्काम, सुस्त राजकारण्यांचा घेतला खरपूस समाचार
अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात एक नव्हे दोनदा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेले तथा आदर्श गाव पाटोदा चे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी शारदीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. ‘प्रत्येक गोष्टीत काही तरी चांगलं असतं, त्यात शिकायला काय मिळतं ? ते बघा’ असे महत्वपूर्ण विधान त्यांनी आपल्या व्याख्यानातून केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा. र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित या व्याख्यानमालेत ‘ग्रामविकासाची संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर, पं.स.चे माजी उपसभापती भिकेश पावबा पाटील, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेस सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय श्यामकांत भदाणे, नरेंद्र निकुंभ यांनी करुन दिला. तत्पूर्वी नुकत्याच निधन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर प्रमुख मान्यवर व देणगीदार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वक्ते भास्करराव पेरे पाटील यांनी जगतगुरु तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, एपीजी अब्दुल कलाम यांचे स्मरण करुन आपली तोफ डागली. सुरुवातीपासून केलेली टोलेबाजीचा रसिकांनी भरभरून आनंद घेतला. ग्रामविकास कसा असावा ? हे सांगताना, निष्काम, सुस्त राजकारण्यांचा खरपूस समाचार घेतला. राजकारण्यांना घेण्याची सवय जडली आहे. ही घेण्याची सवय बंद करुन… देण्याची सवय असावी. अक्कल असेल तर खुर्चीवर बसावं.. काय करता ते ? असे सांगत दारोदारी फिरणाऱ्या पोतराज चे उदाहरण देत नाकर्त्यांना हरामखोर, हलकट, मुर्ख उपाधी दिली. आदर्श गाव पाटोदा चे रुप पालटण्यासाठी केलेलं काम उपस्थितांच्या नजरेत आणून दिले. योग्य व्यवस्थापनामुळे हे सर्व शक्य असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. स्वच्छ पाणी, आरोग्य, शिक्षण, वृक्षसंवर्धन, निराधार वयोवृध्दांचा सांभाळ ही पंचसूत्री स्पष्ट केली. जुन्या गोष्टींना नाव ठेवत बसण्यापेक्षा… प्रत्येक गोष्टीत काही तरी चांगलं असतं, नवीन काय शिकायला मिळतं ते बघा. सरसकट नाव ठेवणं चांगलं नाही. हे समजावून सांगताना अब्दुल कलाम, सिता मातेचे उदाहरण पटवून दिले. समाजासाठी जे करता येईल ते करा, समाजाशिवाय माणूस जगूच शकत नाही. झाडांचे महत्व पटवून देताना संत तुकोबाराय यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ या पंक्ती आठवण करुन दिल्या. टाळ्या टिपून पाऊस पडत नाही त्यासाठी झाडे लावावीच लागतात हा विज्ञानवादी दृष्टीकोन सांगितला. शासन योजना फक्त कागदावर… ? एकीकडे देशावर कर्ज वाढत चालले ते कशामुळे ? खर्च कुठे व कशासाठी करायचा ? याचं तारतम्य नाही. शेतकरी आत्महत्या केल्यावर मदत करण्यापेक्षा तो कसा जगेल हे पाहणं महत्त्वाचे. वृध्दांना मोफत प्रवास करण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास महत्वाचा. सूचनाफलक लावताना वाहन कोठे पार्क करावे, कोठे थुंकावे अशा सकारात्मक सूचना हव्या अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला. खऱ्या चुका तर आपणच करतो त्याची काळजी घ्यायला हवी.
पर्यावरण संवर्धनाचा वेड लागलेल्या नीता पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगतात ग्रामविकासावर मंथन केले. सुमारे २८ हजार ग्रामपंचायती.. गावांसाठी ज्ञानाची गंगा सोबत घेऊन जावी, असा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी नरेंद्र निकुंभ यांनी आभार मानले.