अमळनेरच्या शिरपेचात हेमंतकुमार महाले यांनी रोवला तुरा

दि वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी तर्फे ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान

अमळनेर : येथील मूळ निवासी असलेले हेमंतकुमार महाले यांनी २०२१ मध्ये निर्मित व दिग्दर्शित ‘काळी माती’ या मराठी आणि  ‘काली मिट्टी’ या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनाचे ४४४ अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. परिणामी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कार प्राप्ती बाबतचे आतापर्यंतचे जगभरातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्याप्रित्यर्थ त्यांना दिल्ली येथे पार पडलेल्या समारोहात ख्यातनाम गायक व संगीतकार हंसराज हंस यांच्या हस्ते द वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी तर्फे ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. इंग्लंड, अमेरिका व भारत या तीनच ठिकाणी हे विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्येही श्री महाले व त्यांच्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट, सर्वाधिक व विक्रमी पुरस्कार मिळाल्यामुळेही सदर विद्यापीठाने श्री महाले यांना डॉक्टरेट पदवीसाठी पात्र ठरविले आहे.

हेमंतकुमार महाले यांचा परिचय व कार्ये

श्री महाले यांचे शालेय शिक्षण अमळनेर येथील जी.एस. हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात झाले आहे. त्यांनी दिर्घकाळ स्टेट बँकेतही नोकरी केली आहे. शालेय जीवनापासूनच त्यांना गायनाची व संगीताची आवड होती. १९७८ मध्ये हेमंतकुमार अँड पार्टी या नावाने खानदेशातील कलावंतांना जमवून मोठ्या आर्केस्ट्रास त्यांनी प्रारंभ केला. त्यानंतर पुणे, मुंबई व औरंगाबाद येथील नामवंत कलावंतांचा त्यांनी त्यांच्या आर्केस्ट्रात समावेश केला. हल्ली मुंबई स्थित असलेल्या श्री. महाले यांचा हेमंतकुमार म्युझिकल्स या नावाचा  खूप मोठा म्युझिकल ग्रुप आहे. भारतातील सर्वच प्रमुख पार्श्वगायक, गायिका व वादक त्यांच्या या म्युझिकल ग्रुप मध्ये  आहेत. भारतात आणि भारताबाहेरही त्यांचे हजारो म्युझिकल कार्यक्रम झाले व होत आहेत. अनेक मोठ्या राजघराण्यांच्या शाही विवाह सोहळ्यांनाही श्री.महाले यांना संगीत रजनी साठी पाचारण केले जाते. म्युझिकल शोजच्या क्षेत्रातही त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उच्चांक मोडीत काढले आहेत. त्याबद्दलही त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना युट्युबचे प्लॅटिनम बटन प्राप्त आहे. त्यांची व्ह्यूवरशिप ८५ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांच्या व्ह्यूवरशिप मध्ये रोज होणारी वृद्धी ही लाखांच्या घरात असते. २३ लाखाहून अधिक त्यांचे सबस्क्राईबरस आहेत. संगीत क्षेत्रातील विकिपीडिया म्हणूनही ते ख्यातनाम आहेत. असंख्य गाणी व त्या असंख्य गाण्यांचे गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, चित्रपट, नायक व नायिका यांची नावे त्यांना मुखोदगद आहेत. म्युझिकल शो क्षेत्रात ‘शो मॅन ऑर्गनायझर’ अशी त्यांची ख्याती आहे. भल्या मोठ्या संख्येतील विविध वादकांच्या ताफ्यासह होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते नेहमीच आगळे वेगळे संगीतिय प्रयोग करीत असतात. देशातील अग्रगण्य कलावंतांना सोबत घेऊन कार्यक्रम करताना त्यांनी अनेक नवख्या गुणी कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्यामुळे अनेक कलावंत नावारुपाला आले आहेत.

श्री. महाले यांच्या कला व संगीत क्षेत्रातील यशाचा सतत चढता आलेख, अफाट अवाका व प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात राहूनही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. अतिशय साधी राहणी, निगर्वी व्यक्तिमत्व व मधुरभाषी म्हणून ते सर्वपरिचित आहेत. कला, संगीत व चित्रपट क्षेत्रात त्यांना कोणतीही पारिवारिक पार्श्वभूमी नाही. कोणीही गॉडफादर नाही. त्यामुळेच एका छोट्याशा गावातून कला जीवनाचा श्रीगणेशा करून यश व कीर्तीच्या माध्यमातून साऱ्या जगाला कवेत घेणारी, गाठलेली उंची व यश विशेष अधोरेखित ठरते. यशासाठी धडपडणाऱ्या अनेक कलावंतांसाठी श्री. महाले सर्वार्थाने आदर्श व प्रेरणा आहेत. अमळनेेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले व मुंबई महापालिकेचे उपायुक्त संजय महाले यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!