उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना बक्षीस

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त २८ सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीतील २० विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला. परिक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. त्यातील पाच विद्यार्थ्यांची निवड करुन बक्षीस देण्यात आले. यात, प्रथम : हर्षला विनायक पाटील (दहावी), द्वितीय : भाग्यश्री सतीश पाटील (नववी), तृतीय :भाग्यश्री महेंद्र पाटील (दहावी), उत्तेजनार्थ : श्वेता गौतम बैसाणे (नववी), संजना शिवाजी पाटील (दहावी) यांचा समावेश आहे. स्पर्धा प्रमुख आय.आर.महाजन यांच्याकडून जाहीर बक्षिसे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते देण्यात आली. सर्वसामान्यांना हवी ती योग्य माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. नागरिकांना शासन दरबारी नेमकं काय चाललंय ? हे समजून घेण्याचा अधिकार माहितीचा अधिकार मुळे मिळालेला आहे. त्याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे या हेतूने २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मार्गदर्शन केले.
अनिल महाजन म्हणाले की, माहितीचे अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात लागू झाल्यापासून देशातील व राज्यातील भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात अंकुश बसत आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे व इतर शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराला वाव राहू नये यासाठी माहितीचा अधिकार या कायद्याची निर्मिती झाली. परंतु या कायद्याचा प्रचार व प्रसार व्यापक होण्याची गरज आहे. विविध शाळा, महाविद्यालयात कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्यान सारखे उपक्रम राबविले तर कायद्याचा प्रचार व प्रसार होईल व विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराबाबत माहिती होईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर महाजन यांनी तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.