अमळनेर : ‘कोणाचे वाईट करुन समृध्दी येत नाही तर माणसाने प्रयोगशील असायला हवं’ असे मत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे निवृत्त संचालक तथा प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी शारदीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा. र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित या व्याख्यानमालेत ‘संघर्षातून समृद्धीकडे’ या विषयावर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ते बोलत होते. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ.निखिल बहुगुणे, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेस सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय सौ.वसुंधरा लांडगे, शरद सोनवणे यांनी करुन दिला. यानंतर प्रमुख मान्यवर व देणगीदार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच अमळनेरचा नावलौकिक वाढविणारे दोन सुपुत्र हेमंतकुमार महाले व अजय भामरे यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.
डॉ.तात्याराव लहाने पुढे म्हणाले की, जो रस्ता बदलतो तो खरं तर खडतर रस्त्याने जातो पण त्याला यश मिळतेच. कारण बदललेल्या रस्त्यावर गर्दी नसते. कधी अडचण देखील येते पण जिद्द सोडू नये. कोणाचे वाईट करुन समृध्दी येत नाही तर माणसाने नेहमी प्रयोगशील असायला हवं.. ध्येय एक असावे. खोटं कधी करायचं नाही हे संस्कार असावे. प्राध्यापक ने आपला कित्ता न गिरवता समोर मुलांच्या खुर्चीत बसावं, त्यांना समजून घ्यावं तरच चांगली मुले घडतील. असा मार्मिक टोला लगावला आपला शैक्षणिक प्रवास उलगडला. १८ ते ३० वयात जो मेहनत घेतो त्याला पुढे फार काही करायची गरज नसते. सकाळी उठतो तो यश मिळवितो. नूसता पैसा असूनही उपयोग नाही. उपलब्धी आणि समृध्दी बाबत सांगताना मेरीट ही उपलब्धी असून समृध्दी मिळवावी लागते. प्रभाव पाडायचा असेल तर तसे वागावे लागते. वेगळेपण निर्माण करावे लागते. त्या त्या वेळची परिस्थिती पाहून मार्ग निवडावा लागतो. कोणीतरी त्या कामाची दखल घेत असतो. ज्यावेळी एकाच वेळी आरोग्य शिबीरात एक लाख शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यावेळी स्व.विलासराव देशमुख यांनी त्या कार्याची नोंद घेत थेट पद्मश्री साठी नाव दिले यापेक्षा काय हवे. जीवनात संघर्ष हा आहेच तो संघर्ष करताना येणारे अडथळे दूर करुन मार्ग काढायचा असेल तर ‘निंदकाचे घर असावे शेजारी..’ या उक्तीची आठवण करुन दिली. निंदकच आपला रस्ता मोकळा करुन देत असतो म्हणून निंदकाचे ऐका असेही ते म्हणाले. जाता जाता उपस्थितांना त्यांनी आरोग्यासाठी विविध आजारांवर काही टिप्स दिल्या. “जर का खाल पिझ्झा आणि बर्गर… रोगाने व्हाल जर्जर.” असे सांगत १९४७ ला हृदयविकाराचे प्रमाण साधारणपणे १८ टक्के होते ते आज ४७ टक्के इतके वाढले आहे याचे कारण जंक फूड असल्याचे सांगितले. मोबाईलमुळे होणारी हानी लक्षात घेता लहान बाळांना मोबाईल देऊ नये, अंधारात मोबाईलचा वापर करु नये असा सल्ला दिला. शेवटी सौ.वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले.