मृत्यूनंतर आपले आयुष्य संपत नसून शारिरीक बाह्यावस्था बदलते पण आत्मा बदलत नाही : डॉ.मेधा खासगीवाले

अवघड विषय सोपा करत शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफले

अमळनेर : ‘मृत्यूनंतर आपले आयुष्य संपत नसून शारिरीक बाह्यावस्था बदलते पण आत्मा बदलत नाही’ असे मत डॉ.मेधा खासगीवाले यांनी शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा. र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित या व्याख्यानमालेत ‘आत्म्याचा प्रवास व मृत्यू पश्चात जीवन’ या विषयावर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात त्या बोलत होत्या. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मयुरी जोशी व मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेस सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय सौ.स्नेहा एकतारे व सुरेश माहेश्वरी यांनी करुन दिला. यानंतर प्रमुख मान्यवर व देणगीदार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


डॉ.मेधा खासगीवाले म्हणाल्या की, मृत्यूनंतर आपले आयुष्य संपते का ? हा सर्वांचाच प्रश्न असावा. मृत्यू अस्तित्व संपवून टाकते असं आपल्याला वाटत असते. पण तसे काहीच नसते. मृत्यूनंतर आपले आयुष्य संपत नसून शारिरीक बाह्यावस्था बदलते पण आत्मा बदलत नाही. यावर शास्त्रीय आधार घेतला जातो ते गैर नाही पण मान्य न करणं चुकीचं आहे. युरोप आणि अमेरिकेत यावर खूप मोठे संशोधन होत आहे. आत्म्याचे सजीव व निर्जीव असे दोन प्रकार. आपल्याला सजीव करणारी उर्जा म्हणजे आत्मा. यात देहाचे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह असे तीन प्रकार आहेत. स्थूल देह स्थूल पंचमहाभूतांपासून झालेला असतो. स्थूल देह रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थी व रेत या धातूंनी बनलेला असतो. सूक्ष्म देह सूक्ष्म पंचमहाभूतांपासून झालेला असून तो माणसाच्या मनात ज्या अनंत वासना असतात, त्या वासनांचे मिळून बनलेला असतो. कर्मेंद्रियाद्वारा मनुष्य जे काही करतो व ज्ञानेंद्रियाद्वारा जे विषय ग्रहण करीत असतो, त्यांचे संस्कार त्याच्या चित्तात उमटत असतात. त्या संस्कारांच्या अनुकूल, प्रतिकूलतेप्रमाणे माणसाच्या वासना बनतात. या वासनांचा समुच्चय, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व अंत:करण ही सर्व मिळून सूक्ष्म देह होतो. स्थूल व सूक्ष्म या दोन्ही शरीरांना कारण असलेला तिसरा देह म्हणजे ब्रह्मस्वरुपाबद्दलची अविद्या होय. या देहावर अभिमान ठेवणार्‍या जीवाला प्राज्ञ म्हणतात. सर्व कारण देहांवर अभिमान ठेवणार्‍या आत्म्याला ईश्वर म्हणतात.

अन्नमय, प्राणमय, वासना, चेतना, मनोमय, ज्ञानमय, विज्ञानमय असे सात कोष असतात असे सांगून त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सुक्ष्मदेह व जडदेह यातला संबंध, मृत्यू पश्चात जीवन समजावून सांगितले. मृत्यू पश्चात आत्मा भूवर लोकांत आशा, आकांक्षा घेऊन प्रवेश घेतो. मृत्यू पश्चात स्पिरीट गाईड विविध माध्यमातून मेसेज देत असतात. उदा. स्वप्न, पुनर्जन्म. अस्तित्व सिद्ध करण्यासाठीच पुनर्जन्म मिळतो. घडून गेलेल्या घटना अस्तित्व सिध्द करतात. दोन जीवांमध्ये फरक का ? पुन्हा मानवी जन्म मिळणार हे माहीत असूनही मनुष्य मृत्यूला का घाबरतो ? असाही प्रश्न पडतो. तर त्याचे कारण म्हणजे चांगले व वाईट काम. आपण सगळेच अनंताचे प्रवासी आहोत. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमाणकर्म यावरच पुढच्या जन्माचे सर्व काही ठरते. परमेश्वर आपण केलेल्या कर्माची परतफेड करत असतो. यामुळे नेहमी चांगले कर्म करत राहा असा मौलिक विचारही सांगितला. शेवटी सुरेश माहेश्वरी यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!