बहारदार शैलीत संत साहित्याचे विचार पेरत मराठी वाड्मय मंडळ आयोजित शारदीय व्याख्यानमालेचा झाला समारोप
अमळनेर : येथील मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे पाचवे समारोपीय पुष्प संत साहित्याचे अभ्यासक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गुंफले. ‘प्रश्न आजचे’ हा त्यांचा विषय होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन व्याख्यानमालेस सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.प्रकाशदादा धर्माधिकारी व सोबत मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचा परिचय सौ.वसुंधरा लांडगे, संदीप घोरपडे यांनी करुन दिला. यावेळी मान्यवरांच्या सत्कारासोबत संगीत पुरस्काराने गौरविण्यात आलेले डॉ.अमोघ जोशी, देणगीदार व पडद्यामागचे कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. अमळनेेर येथील मसाप शाखा, खानदेश साहित्य संघातर्फेही प्रा.मिलींद जोशी यांचा सानेगुरुजींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात, सन १९५२ मधील साहित्य सम्मेलनाचा इतिहास उलगडला. अध्यक्षीय भाषणात डॉ.अविनाश जोशी म्हणाले की, व्याख्यानमालेसाठी वक्ते निवड करताना निकष लावले गेले. साहजिकच सर्व व्याख्याने छान झाली. हातातली एखादी गोष्ट निसटून जाते तर अशावेळी प्रयत्न सोडू नये. आत्मिक भाव शुद्ध असेल तर आपण काहीही करु शकतो. लवकरच अ.भा.साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून ज्याला जे जे शक्य आहे तसा हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले. याचप्रमाणे खानदेश फेस्टिवल भरविण्याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टी पॉझिटीव्ह विचाराने होत असतात. सगळे जण सारखे असून उणीदुणी नको. जगन्नाथाचा रथ सर्वांनीच ओढायचा असतो असे नम्रपणे नमूद केले.
आपल्या बहारदार शैलीत प्रा.मिलिंद जोशी यांनी सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, पुणे ही सांस्कृतिक राजधानी तर अमळनेर ही उपराजधानी आहे. संतांचे साहित्य तरुण वयातच वाचायला हवे. उतारवयात वाचले तर आपण वाचणार का? हा विचार गरजेचा आहे. संत साहित्यात उत्तम जीवनशैली सांगण्यात आली आहे. मात्र आपण याउलट वागतो. आहार, आचार, विचार यात बदल करतो. साहजिकच यामुळे आरोग्याची हानी होत असते. एकांत आणि एकाग्रता ही मुल्य मानली गेली आहेत. पण निवांतपणा, स्वास्थ्य आहे कुठे ? चंगळवादी समाजात व्यसनाधीनताचे प्रमाण खूपच वाढले आहे. यावर अनिल अवचट यांना समाजाचं अधःपतन का ? असा प्रश्न विचारला. यावर पूर्वी तरुण मोठ्यांचा सन्मान ठेवत, आता मात्र मोठ्यांनाही तरुणांकडे पाठ फिरवून घ्यावी लागते असे उत्तर मिळाले. तरुण पिढीला संत साहित्यातील आधुनिकता व महत्व सांगितले पाहिजे. त्यात फुलेही आहेत व काटेही. संत साहित्य आशा व निराशेत ज्योत तेवत ठेवण्याचे काम करत असते. हे सांगताना संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, गदिमा, रा.चिं.ढेरे, रामचंद्र देखणे, पु.ल.देशपांडे, दाभोळकर, गाडगेबाबा, शेवाळकर यांचे दाखले दिले. मोठ्या लोकांचे चरित्र, आत्मकथन जरुर वाचायला हवे. आजूबाजूला पाहून सकारात्मकता शिकली पाहिजे. आतून ज्ञानाचे पंख लावण्याची गरज आहे. सद्गुण व गुणवत्ता शोधून काम दिले पाहिजे हेच विसरत चाललो आहोत. सर्वत्र स्मशान शांतता, गंभीरता आहे. ही गंभीरता, दु:ख दूर करण्याची ताकद हास्यात आहे. हास्य हे श्रेष्ठ असून जीवनाचे संगीत आहे. हास्यासाठी कसलीच गरज लागत नाही. हास्य असाव पण हसू होऊ नये . संतांची भुमिका विज्ञाननिष्ठच.. समाजाची उन्नती व्हावी हाच संतांचा उद्देश होता. आपण दिखाऊपणा च्या नादात टिकाऊपणा गमावतो आहोत. दिखाऊपणा वर मात करता आली पाहिजे. १८ पगड जाती विठ्ठलाचे चरणी लीन होतात हा संत साहित्याचा अभिमान आहे. संतांची जाती जातीत विभागणी हे षडयंत्र सुरु असून वेळीच सावध झाले पाहिजे. विश्वास हाच समाज जीवनाचा केंद्रबिंदू आहे. असे सांगत शेवटी ज्याच्या डोळ्यात अश्रू येतात तोच दुसऱ्याचे अश्रु पुसू शकतो अशी भावनिक साद घातली. शेवटी सौ.वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी मराठी वाड्मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.