अमळनेर : तालुक्यातील देवगांव देवळी येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत, जि.प.शाळा, म.फुले हायस्कूल, अंगणवाडी कर्मचारी, बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक मनोहर मोरे, ग्रामसेवक कमलेश निकम, सरपंच सौ.सरला पाटील, उपसरपंच संदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील छोटू मोरे, अविनाश बैसाणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
शाळेचा विद्यार्थी शरद खैरनार याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळविले. भारतीय संरक्षण मंत्रालयात त्याची निवड झाल्याने सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व मान्यवर यांनी त्याचा शाल श्रीफळ देऊन कार्यक्रमात सत्कार केला. जिल्हा परिषद शाळा, महात्मा फुले हायस्कूलचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी गावात प्रभात फेरी काढून स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेविषयी जनजागृती केली. घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी देवगांव देवळी ग्रामपंचायत, जि.प.शाळा, म.ज्योतीराव फुले हायस्कूल यांनी संयुक्तपणे स्वच्छता अभियान राबवून जनजागृती केली. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, सत्कारमूर्ती शरद खैरनार, देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन, एच.ओ.माळी व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बंधू व भगिनी, बचत गट, अंगणवाडी कर्मचारी, एम.एस.डब्ल्यू चे विद्यार्थी, पालक व शिक्षण प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले.