शिवक्षेत्र खवशी येथील गुरुचरित्र पारायणाचे यंदा तेरावे वर्ष
अमळनेर : तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यास गुरुवार दिनाक १ डिसेंबर २०२२ पासून सुरुवात झालेली असून बुधवार दिनाक ७ डिसेंबर २०२२ रोजी दत्त जयंती ला समाप्ती होणार आहे. गुरुचरित्र पारायणाचे यंदा तेरावे वर्ष आहे. यावर्षी ७० पुरूष व महिला सेवेकरी पारायणास बसले असून सामुदायिक वाचन होत आहे. दररोज सकाळी ४ ते ६ या वेळेत पारायण वाचन होत आहे. ६ ते ६.३० भूपाळी आरती व सकाळी १०.३० व संध्याकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती होत आहे. तसेच आरती नंतर दररोजची नित्य सेवा होत आहे. दिनांक ७ तारखेला दत्त जयंती उत्सव साजरा करून संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजिलेला आहे. गावातील श्री शशिकांत बळीराम कापडे हे महाप्रसादाचे मानकरी आहेत. महाप्रसाद होऊन पारायणाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांपासून पारायण वाचनाच्या वेळेत थोडाही बदल झालेला नाही. सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र खवशी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.