युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर ने चालविलेला उपक्रम
अमळनेर : ‘जो चूकीतून शिकतो, तोच भविष्यात मोठा होत असतो’ असे मत मार्गदर्शक संदीप घोरपडे यांनी व्यक्त केले. येथील सानेगुरुजी विद्यालयात महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत मास महोत्सवास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे होते. सोबत व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा अशोक पवार, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, पत्रकार संजय सूर्यवंशी, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, सुकदेव शेलार उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले व विश्वतत्वज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना प्रा.अशोक पवार यांनी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबतची भूमिका विशद केली. नुकताच शिवजयंती २०२३ पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दिनांक ५ एप्रिल ते ५ मे या एक महिन्याचे काळात ६६ वक्ते ६६ ठिकाणी शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व गावागावात जाऊन महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवणार आहेत. या उपक्रमात अनेकांनी सहभाग नोंदविला असून उपक्रमात सहभागी सर्वांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगितले. दिनांक ११ एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेल्या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दिनांक २९ व ३० एप्रिल रोजी वक्त्यांची कार्यशाळा घेण्यात येणार असून दिनांक ११ मे रोजी सानेगुरुजी जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर विद्यार्थी अजिंक्य सोनवणे, यश पाटील, कु.निकीता पाटील यांनी महापुरुषांबद्दल भाषणे केली.
मनोगत व्यक्त करताना वक्ते अशोक बिऱ्हाडे म्हणाले की, ‘महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नुसते पूजन करुन चालणार नाही. तर त्यांचे विचार घराघरात पोहोचवणे आवश्यक आहे. समोरचा फोटो एक चित्र नसून ते एक चरित्र आहे. हे चरित्र वाचून ते पेरण्याची गरज आहे. कोणीही उपजत कला/कार्य घेऊन जन्माला येत नसून मोठ्या मेहनतीने ते कार्य निर्माण करावे लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे समन्वयक बापूराव ठाकरे यांनी घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सानेगुरुजी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचा जास्त वेळ न घेता आटोपशीर कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचलन जे.एस.पाटील यांनी तर मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.