अमळनेर : जे स्वतःसाठी जगले त्याची नोंद जगाने कधीच घेतली नाही. तर, जे दुसऱ्यासाठी आयुष्य वेचतात त्यांची नोंद जगात होते असे मत श्री मंगळग्रह मंदिर संस्थान चे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात समारोपाच्या दिवशी झालेल्या कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार व प्रा.डॉ. लिलाधर पाटील हे या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संदीप घोरपडे, रामेश्वर भदाणे, चंद्रकांत देसले, बापूराव ठाकरे, वैशाली शेवाळे, संजय सूर्यवंशी, प्रेमराज पवार, दयाराम पाटील, चेतन जाधव, सोपान भवरे, अजय भामरे, गौतम मोरे, राहुल निकम, मिलिंद निकम यांचेसह विद्यार्थी वक्ते उपस्थित होते. प्रास्ताविक करताना दोन दिवसीय वक्तृत्व कार्यशाळेबाबत प्रा. अशोक पवार यांनी भूमिका मांडली.
मार्गदर्शनपर भाषणात डिगंबर महाले म्हणाले की, कोणताही पैलवान हा एका दिवसात तयार होत नाही त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. शब्द हे धगधगते हत्यार आहे. प्रभावी वक्ता काय करू शकतो ? हे त्याच्या शब्दांवर ठरत असते. समोरची व्यक्ती आपल्यातलीच आहे असे समजून वक्त्याने बोलावे असे सांगत आवश्यक त्या टीप्स दिल्या. महान व्यक्ती दुसऱ्यासाठी जगल्या त्यामुळे त्यांची आजही आदरपूर्वक आठवण केली जाते. जे स्वतःसाठी जगले त्याची नोंद जगाने कधीच घेतली नाही. तर, जे दुसऱ्यासाठी आयुष्य वेचतात त्यांचीच नोंद जगात होते असेही त्यांनी सांगितले.
प्रा. लिलाधर पाटील यांनी पहिल्या दिवशी केलेले मार्गदर्शन लक्षात घेऊन सर्व विद्यार्थी वक्त्यांनी आवडीच्या विषयावर भाषणासाठी केलेल्या आराखड्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यात राहिलेले मुद्दे तपासून अधिक भर घालणारे मुद्दे सुचविले. वक्तृत्वात वक्ता बोलत नसून त्याचा चेहरा बोलत असतो. हे सांगताना त्यांनी सुधीर सूर्यवंशी यांच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. कोणाचा प्रवास कुठून कुठपर्यंत होऊ शकतो ? हे कोणीही सांगू शकत नाही. वक्तृत्व हा अभ्यास, सातत्य व साधनेचा भाग आहे. चांगला वक्ता होण्यासाठी भाषण करताना उभे राहण्याची पद्धत, पोशाख, भाषणावेळी नजर, माईक मधील अंतर, भाषणातील शब्दांचे अर्थ, चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढ उतार, वेळेचे भान, श्रोत्यांचा आदर अशा अनेक मुद्द्यांवर स्वामी विवेकानंद व नेहरुंच्या भाषणाचा दाखला देत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थी वक्ते यांचे सहा गट तयार करुन प्रत्येक गटात सहा विद्यार्थी होते. प्रत्येक गटाला मंचावर प्रत्यक्ष कार्यक्रम सादरीकरणाची संधी देण्यात आली. सर्वांनी आत्मविश्वासाने छान सादरीकरण केले. यात.. समाज सुधारक, भ्रष्टाचार, स्त्री, छत्रपती शिवराय, मोबाईलचे दुष्परिणाम, विज्ञानाचे महत्त्व, स्वतंत्रता, श्यामची आईमधील अळणी भाजी गोष्ट, आदिवासींचे प्रश्न, पंडिता रमाबाई, मोबाईल शाप की वरदान या विषयांचा समावेश होता. निरीक्षक म्हणून संदीप घोरपडे व रामेश्वर भदाणे यांनी काम पाहिले. रामेश्वर भदाणे यांनी वीर रस असलेल्या वाक्यातील चढउतार समजावून सांगितले व सर्वांचे कौतुक केले. संदीप घोरपडे यांनी प्रत्येकातील कला गुण सांगत काय कमी ? काय करायला हवे ? याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. अशोक पवार यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले. युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर तर्फे दिनांक ५ मे रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे जयसिंग वाघ लिखीत पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात कार्यशाळेतील सर्व सहभागी वक्त्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मास महोत्सवातील सहभागी वक्त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बापूराव ठाकरे यांनी केले. कार्यक्रम स्थळी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.