समाजासाठी वेळ देणं हीच खरी भक्ती : सत्यपाल महाराज
अमळनेर : ‘ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है.. इंसान बनेगा’ या पंक्तीला सार्थ ठरवत शेतकरी आत्महत्या, शिक्षण, राजकारण, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, देव धर्म, बुवाबाजी, ज्योतिषशास्त्र, व्यसनाधीनता, स्वच्छता, प्रतिष्ठा, जातीयवाद, अवयवदान, रक्तदान, देहदान आदी विविध विषयांची निर्भिडपणे चिरफाड करत समाजासाठी वेळ देणं हीच खरी भक्ती असल्याचे मत प्रसिद्ध किर्तनकार सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधनातून केले. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या जन्मदिनी पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अभुतपुर्व अशा गर्दीत उपस्थित श्रोत्यांना हसवत वैचारिक डोस देत होते.
वेळेचे भान व श्रोत्यांची दिलगिरी…
कार्यक्रमास तब्बल तासापेक्षा जास्त उशीर झाल्याने सत्यपाल महाराज यांनी स्टेजवर स्वतः गाद्यांची व साधनांची मांडणी करुन वेळेचे भान राखले. उशीर झाल्याबद्दल श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त केली. ‘लेट पण थेट..’ मनावर घाव घालणाऱ्या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमात विविध सामाजिक प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना व विधवा महिलांना सत्यपाल महाराज यांनी वैचारिक पुस्तके आणि साड्यांची भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील यांनी तर प्रतिभाताई शिंदे यांचा परिचय रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी करून दिला. युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी मन आणि मत परिवर्तन व्हावं यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगून प्रतिभाताईंचा जीवनपट उलगडला. प्रमुख मान्यवर व पन्नालाल भाऊ मावळे परिवारातर्फे सत्यपाल महाराजांचा सन्मान करुन प्रतिभाताई शिंदे यांना पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांचे वतीने देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी केले. महत्वाच्या कामामुळे प्रतिभाताई शिंदे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे वतीने उपस्थित बहुजन चळवळीचे नेते मुकुंदराव सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी मानपत्र स्विकारले. मुकुंदराव सपकाळे, सचिन धांडे व राष्ट्र सेवा दलाचे अर्जुन कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम मोरे यांनी केले. संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आदी थोर समाजसुधारकांचे स्मरण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. तत्पूर्वी प्रतिभाताई शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरुन कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधत आभार मानले.
भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे संत तुकडोजी महाराज म्हणत. महाराष्ट्रात शेतकऱ्याला योग्य न्याय नसल्याने बिकट अवस्था झाली आहे. सात महिन्यात ९६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एखाद्या नेत्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांनी शेतात पेरलं नाही तर काय खाणार धतुरा असे सांगत देशातला शेतकरी जगला पाहिजे असे संबोधित केले. देशातल्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होत असताना देव कुठे आहे ? देव असता तर त्याने अन्याय होऊ दिला असता का ?
आपण शिकले सवरलेले ज्योतिषाकडे जातो आणि भविष्य जाणतो. त्या शिक्षणाचा काय उपयोग. कवयित्री बहिणाबाईंनी ‘ज्योतिषा.. माझे हात नका पाहू.. माझं दैव मला कये’ असं उगाच लिहून ठेवले काय ? भविष्य हे तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे. ज्योतिषाला ग्रह किती लांब आहे हे सांगता येत नाही, अघटीत घटना घडतात तेव्हा ज्योतिषांना का कळत नाही. वडाच्या झाडापेक्षा शाळेला चकरा मारण्याचा सल्ला दिला. सध्या बुवा बाबांवर भरोसा ठेवला जातोय. या भोंदू बाबांच्या नादी लागून तुमचे कल्याण होणार नाही. रुद्राक्ष मिळवताना माणसं मेली असती का ? कोणताच ग्रह मानवावर असर करत नाही. हुशार अमळनेर करांनी मात्र मंगळ ग्रहाचे मंदिरच आणून ठेवले आहे. संत गाडगेबाबांनी माणसात देव बघितला. ते कधी मंदिरात गेले नाही. गाडगेबाबांनी गावोगावी स्वच्छता केली. धर्मशाळा काढल्या, त्यांच्याकडे करोडोची संपत्ती असूनही स्वतःचे नावावर काहीही नाही. आमचे नेते आमदार होतात आणि बघता बघता कोट्याधीश होतात.
श्रोत्यांच्या साक्षीने व्यक्त केली खंत…
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी नटराजाचे स्मरण करुन रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी नाट्यगृहाचे बांधकाम व सुविधा नित्कृष्ट असल्याचे लक्षात आणून दिले. नाट्यगृह निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची शिकस्त व झालेल्या मोठ्या खर्चाचा लेखाजोखा श्रोत्यांच्या साक्षीने मांडला. भविष्यात अघटीत घटना घडू नये यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. योगायोग असा की, कार्यक्रम सुरु असताना २-३ वेळा भार वाढीमुळे विद्युत वायर जळून धूर झाला व त्याचा वास दरवळला. अशातच नाट्यगृहाच्या आतील भिंतीवर चिपकलेली एक टाईल्स खाली कोसळली.. सुदैवाने अघटीत घडले नाही.
भ्रष्टाचारविरोधी बोलताना ते म्हणतात, नोकरीत वा अन्य ठिकाणी भाड खाऊ नका. एकदा डाग लागला की तो पुसला जात नाही. आपली लायकी अशी बनवा की, लोक तुम्हाला ओळखतील. पत्रकार तुमच्या घरी येतील. पैशाच्या मागे धाऊ नका तर पैसा तुमच्या घरी आला पाहिजे. संपत्तीपेक्षा संतती कमवा ती संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असते. हे सांगताना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा दाखला दिला.अवयवदान, देहदान, रक्तदान करुन माणूस बना. नाचणं ही एक कला असताना गौतमी पाटीलचं नाचणं गैर कसे ? आमची मुलगी नाचली की ओरडायचे आणि यांची नाचली की नर्तिका होते. शिक्षणावर बोलताना म्हणाले की, आता सानेगुरुजी कमी आणि नाणे गुरुजी जास्त झाले. आधी सरकारी शाळा होत्या आता शाळांचे ३ प्रकार झाले. या खाजगी शाळा संस्थांत घरचेच पदाधिकारी असतात. या शाळा कोणाच्या असतात. त्यात घेतली जाणारी फी शाळेनुसार वाढत जाते. आता तर सरकारने खाजगीकरण, कंत्राटीकरण यावर लक्ष केंद्रित केले आहे. पैसा द्या आणि शिक्षण घ्या अशी स्थिती येईल. गोरगरीब जनतेचे शिक्षण नसणार. जनतेला शिक्षीत होण्यापासून रोखून अधोगतीकडे नेण्याचे काम सुरु आहे. याचा वेळीच विचार करण्याची वेळ आली आहे. अमळनेर नगरीत फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी हजर राहण्याचे आवाहनही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.