अमळनेर : महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल असा विश्वास राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला. येथील बन्सीलाल पॅलेस मध्ये आज ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. सोबत व्यासपीठावर बोधचिन्हाचे उद्घाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी यांचे समवेत खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते कलाशिक्षक प्राचार्य मिलिंद भामरे, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करुन आदरांजली वाहिली. मान्यवरांच्या शुभहस्ते बोधचिन्हाचे फीत कापून अनावरण करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, येथील भूमिपुत्राने निर्मिती केलेले बोधचिन्हाचे अनावरण होणं निश्चितच अभिमानास्पद आहे. उत्कृष्ट बोधचिन्ह झाले असून त्यात खानदेशी प्रत्येक गोष्ट साकारली आहे. हे बोधचिन्ह जगभरात नावलौकिक करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अमळनेर सारख्या छोट्या गावात सन १९५२ मध्ये साहित्य संमेलन झाले. प्रताप शेठजींनी उभारलेले प्रताप महाविद्यालय व प्रताप तत्त्वज्ञान मंदिर जगात प्रसिद्ध आहे. साने गुरुजींची चळवळ येथूनच सुरु झाली. येथील सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनासाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन होईल असा विश्वास व्यक्त करत एकजूटीने साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले. बोधचिन्ह अनावरण झाल्याने आजपासून संमेलनाला खरी सुरुवात झाली आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.
बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी म्हणाले की, अमळनेर येथे ७२ वर्षानंतर होणारे हे साहित्य संमेलन आत्मियतेचा विषय आहे. यासाठी समर्पक बोधचिन्ह उपलब्ध करून दिले. अमळनेरची सांस्कृतिक जडणघडण आहे. संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, प्रताप शेठ व अजित प्रेमजी यांची उद्योग भूमी आहे. शाळेची पायरी न चढलेल्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले ही जगातली अद्भुत घटना आहे. बहिणाबाईंनी कवितेतून तत्वज्ञान मांडले आहे. मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते. विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. मराठी साहित्य संमेलन श्वास असून खानदेशासाठी अभिमानाची बाब आहे. प्राचार्य मिलिंद भामरे म्हणाले की, मी अमळनेरचा असून परमेश्वराने माझ्याकडून बोधचिन्ह साकारण्याची सेवा करून घेतली आहे. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ व शिरीष चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, शामकांत भदाणे, रमेश पवार, सोमनाथ ब्रम्हे, प्रदीप साळवी, पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे भैय्यासाहेब मगर, श्याम पवार, शीला पाटील, रजनीताई केले, साहित्यिक कृष्णा पाटील, शरद धनगर, रेखा पाटील, सुनिता पाटील, सुभाष घोडगावकर, हिरामण कंखरे, हरी वाणी, बजरंग अग्रवाल, विनोद पाटील, सुलोचना वाघ, नयना पाटील, माधुरी पाटील, ब्रह्माकुमारी विद्यादेवी, श्याम अहिरे, , मनोज पाटील, गोकुळ बोरसे, बी. के. सूर्यवंशी, डॉ. रामलाल पाटील, पुनम साळुंखे, डॉ. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.